बाळासाहेब असते तर नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती : अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 06:00 IST2025-05-27T05:59:43+5:302025-05-27T06:00:11+5:30
सिंदूर स्वस्त नाही. त्याला हानी पोहोचविल्यास रक्ताने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही अमित शाह यांनी दिला.

बाळासाहेब असते तर नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती : अमित शाह
नांदेड : भारताकडे डोळे वटारून कुणी पाहिल्यास त्याचे परिणाम काय होतात, हा संदेश ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने जगाला दिला आहे. पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला जगभरात पाठविण्याचा निर्णय झाला. परंतु त्यावर उद्धवसेनेच्या एका खासदाराने ही कुणाची वरात चालली म्हणून टीका केली. बाळासाहेबांच्या उद्धवसेनेतील हे नेते असे बोलत आहेत. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींची गळाभेट घेतली असती, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धवसेनेवर टीका केली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंखनाद सभेसाठी शाह सोमवारी नांदेडात आले होते. नवा मोंढा मैदानावर आयोजित सभेत ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूर राबवून अवघ्या २२ मिनिटांत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. आमचे सैन्य, नागरिक किंवा सीमांशी छेडखानी केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा संदेश त्या माध्यमातून गेला. तर दुसरीकडे ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’च्या माध्यमातून छत्तीसगडच्या जंगलात अनेक जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद समाप्त करणार आहोत.
काँग्रेस पाकव्याप्त झाली : देवेंद्र फडणवीस
‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. सर्व भारतीयांनी त्यासाठी एकजूट दाखविली; परंतु राहुल गांधी यांचे मला समजत नाही. किती विमाने पडली, असे प्रश्न ते विचारत आहेत. हे विचारण्याची पाकिस्तानमध्येही ताकद नाही. काँग्रेसची अवस्था सध्या पाकव्याप्त झाली आहे. पाकिस्तानी विचारांचा त्यांच्यावर पगडा आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
सिंदूरला हानी पोहोचविल्यास रक्ताने उत्तर
पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचवेळी दहशतवादी कुठेही लपले तरी त्यांना शोधून मारणार, असे स्पष्ट केले होते. परंतु बहुधा पाकिस्तान विसरला असावा की, देशात ११ वर्षांपासून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. पाकिस्तानने केलेले ड्रोन, मिसाईल हल्ले भारताच्या भूमीला स्पर्शही करू शकले नाहीत. सिंदूर स्वस्त नाही. त्याला हानी पोहोचविल्यास रक्ताने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी दिला.