मी वर्षापासून भाजपात, त्यापूर्वी गुंडांना कुणी प्रवेश दिला? चव्हाण यांचा चिखलीकरांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 19:15 IST2025-05-23T19:13:52+5:302025-05-23T19:15:12+5:30

आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या उपस्थितीत मटका किंग अन्वर अली खान याला राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावरून सध्या महायुतीतील दोन पक्षात चांगलीच जुंपली आहे.

I have been in BJP for a year, who gave entry to goons before that? Ashok Chavan questions Pratap Patil Chikhlikar | मी वर्षापासून भाजपात, त्यापूर्वी गुंडांना कुणी प्रवेश दिला? चव्हाण यांचा चिखलीकरांना सवाल

मी वर्षापासून भाजपात, त्यापूर्वी गुंडांना कुणी प्रवेश दिला? चव्हाण यांचा चिखलीकरांना सवाल

नांदेड : भाजपातदेखील अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. असा आरोप आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी केला होता. त्यावर खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले, मी वर्षभरापासून भाजपात आहे. त्यापूर्वी गुंडांना भाजपात कोणी प्रवेश दिला? हे चिखलीकरांनी सांगावे असा टोला लगावला. 

आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या उपस्थितीत मटका किंग अन्वर अली खान याला राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावरून सध्या महायुतीतील दोन पक्षात चांगलीच जुंपली आहे. मंगळवारी चिखलीकरांनी भाजपातही अनेक गुंड मंडळींना प्रवेश दिल्याचा आरोप केला. त्याला बुधवारी खासदार चव्हाणांनी उत्तर दिले. मी वर्षभरापासूनच भाजपात आहे. त्यापूर्वी भाजपात असलेल्या चिखलीकरांनी किती गुंडांना प्रवेश दिला ते सांगावे, असे आव्हान दिले. छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याबाबत चव्हाण म्हणाले, ही आनंदाची बाब आहे. माझ्यासोबत त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत. ओबीसी चेहरा असल्याने सामाजिक समतोल झाला आहे. तसेच नांदेडमध्ये विभागीय आयुक्तालय व्हावे यासाठी एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. परंतु ती भेट झाली आहे. आता मुख्यमंत्री नांदेडला आल्यावर त्यांच्याशी आयुक्तालयाबाबत बोलू असे चव्हाण म्हणाले.

२६ मे रोजी अमित शाह नांदेडात
येत्या २६ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नांदेड दौरा निश्चित झाला आहे. दौऱ्याबाबतची रूपरेषा आणि अन्य कार्यक्रमांची सविस्तर माहिती उद्या देणार आहे. शाह यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे काही नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. ते कोण असतील हे वेळेवर कळेल, असेही खासदार चव्हाण म्हणाले.

Web Title: I have been in BJP for a year, who gave entry to goons before that? Ashok Chavan questions Pratap Patil Chikhlikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.