नांदेड हादरलं! जुळ्या मुलींपैकी एका मुलीची पाण्यात फेकून हत्येनंतर बाप आरामात घरी परतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:41 IST2026-02-02T15:40:31+5:302026-02-02T15:41:03+5:30
'मी काय केलं मलाच माहीत नाही!'; मुलीची हत्या करून बापाचा अजब दावा

नांदेड हादरलं! जुळ्या मुलींपैकी एका मुलीची पाण्यात फेकून हत्येनंतर बाप आरामात घरी परतला
मुखेड (जि. नांदेड) : शहरातील बाराहाळी चौकात राहणाऱ्या पित्याने पोटच्या ७ वर्षीय मुलीस तेलंगणा राज्यातील कटापल्ली-बोधन रोडवरील कॅनॉलमध्ये फेकून देऊन मारले. ही घटना २९ जानेवारी रोजी घडली. याबाबत तेलंगणा पोलिसांनी मुखेड पोलिस ठाण्यात फोन करून कळविले. यानंतर रात्री उशिरा येडपल्ली पोलिसांनी मुखेड येथून आरोपीस उचलले; परंतु पित्याने कशाकरिता मुलीस मारले हे कारण मात्र अद्याप कळले नाही.
मुखेडातील बाराहाळी चौकात वास्तव्य करणारा पांडुरंग बाबूराव कोंडामंगले ( रा. केरूर, वय ३२) याने मुलगी प्राची हीस दुपारी १२ वाजेदरम्यान दुचाकी वाहनावर बसविले आणि पत्नीस नांदेडला जातो म्हणून तेलंगणा राज्यातील कडपल्ली येथील रस्त्यालगत असलेल्या कॅनॉलमध्ये फेकून दिले आणि सायंकाळी मुखेड येथे परत एकटाच आला. घटनेनंतर स्थानिकांनी पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या मुलीस पाण्याबाहेर काढून पोलिसांना कळविले. मुखेड पोलिसांनी आरोपी पांडुरंग कोंडामंगले यास चौकशीसाठी बोलावले असता ‘मी आर्थिक विवंचनेत असल्याने मी काय केले हे मला माहीत नाही, अशी माहिती दिली.
पोटच्या मुलीला पित्याने का मारले? याचा उलगडा तेलंगणा पोलिस तपासात निष्पन्न होईल; पण दोन जुळ्या मुलींपैकी एका मुलीस का मारले व तिला सोडून तो मुखेडला पळून का आला, हे कळत नाही. आरोपी पांडुरंग कोंडामंगले यास येडापल्ली पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेऊन नेले, अशी माहिती पोलिस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांनी दिली. प्राची कोंडामंगले हिचे पार्थीव घेऊन नातेवाईक मुखेडकडे निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली.