नांदेडमध्ये ऑनर किलिंग; वडील आणि भावांकडून डॉक्टर मुलीची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 12:37 IST2023-01-27T11:42:37+5:302023-01-27T12:37:33+5:30
Nanded Honor Killing : पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीचा मृतदेह जाळून राख ओढ्यात फेकून दिली.

नांदेडमध्ये ऑनर किलिंग; वडील आणि भावांकडून डॉक्टर मुलीची निर्घृण हत्या
Nanded Honor Killing : नांदेड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी ऑनर किलिंग घटना घडली आहे. मुलीच्या प्रेमामुळे संतापलेल्या वडील, भाऊ आणि मामांनीच मुलीची हत्या केली आणि गुपचूप मृतदेह जाळून टाकला. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे घडली आहे. शुभांगी जोगदंड असे मुलीचे नाव असून, ती BHMS च्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती.
प्रेम संबंधामुळे कुटुंबीय नाराज
मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय शुभांगी ही BHMS च्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती आणि तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेम जुळले. कुटुंबीयांना त्यांचं नात मान्य नव्हतं. यानंतर घरच्यांनी तिचं दुसरीकडे लग्न जुळवलं, पण तिनं हे लग्न मोडलं. यामुळे आपली गावात आणि समाजात बदनामी झाली, या रागातून आरोपी वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी जोगदंड, कृष्णा आणि गोविंद या दोन चुलत भावांनी मुलीला ठार मारलं.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
शुभांगीची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिला शेतात नेऊन जाळलं आणि तिची राख ओढ्यात फेकून दिली. तीन-चार दिवसांपासून गावातील मुलगी अचानक गायब झाल्यामुळे गावातील लोकांना संशय आला. यानंतर काही नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि हा धक्कादायक ऑनर किलिंगचा प्रकार उघड झाला. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.