नांदेड: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्राच्या तीन दिवसीय दौऱ्याची सुरुवात रविवारी नागपूरपासून झाली आहे. शाह हे सोमवारी नांदेडात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत नवा मोंढा मैदानावर दुपारी दोन वाजता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा शंखनाद केला जाणार आहे. त्याचबरोबर दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
निवडणुकीनंतर अमित शाह हे पहिल्यांदाच नांदेड जिल्ह्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर नवा मोंढा येथील सभेला संबाेधित करणार आहेत. नवा मोंढा मैदानावरील सभेसाठी पावसाच्या पार्श्वभूमीवर वॉटर प्रूफ मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शाह यांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. त्या रस्त्यांचीही डागडुजी करण्यात आली आहे. शाह भाजपाचे महानगराध्यक्ष व खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रंगीत तालीमही केली आहे. नवा मोंढा परिसर तसेच शाह ज्या-ज्या ठिकाणी भेटी देणार आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी रविवारपासूनच तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्राेन उडविण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
पक्ष प्रवेशाकडे लागले लक्षकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यात नांदेडसह मराठवाड्यातील नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे सोमवारी भाजपा काँग्रेसला किती मोठे धक्के देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.