अतिवृष्टीने पीक हातचे गेलं; नैराश्यात शेतकऱ्याने विद्युत वाहिनीस स्पर्श करून जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:16 IST2025-09-27T16:14:56+5:302025-09-27T16:16:14+5:30
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे.

अतिवृष्टीने पीक हातचे गेलं; नैराश्यात शेतकऱ्याने विद्युत वाहिनीस स्पर्श करून जीवन संपवले
नांदेड : शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याने नैराश्यात एका ५९ वर्षीय शेतकऱ्याने घरावर जाऊन विद्युत तारेला स्पर्श करत जीवन संपवले. पंडित वामनराव सोनटक्के असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना २६ सप्टेंबर रोजी वाहेगाव (ता. जि. नांदेड) येथे घडली.
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. दरम्यान, वाहेगाव येथेही गेल्या काही दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू आहे. परिणामी, शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतामधील पिकांचे नुकसान होऊन काहीच उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी पंडित वामनराव सोनटक्के हे निराश झाले. दरम्यान, शेतातील पाणी तसेच असताना पुन्हा पावसाचा तडाखा सुरू झाला. यातच सोनटक्के यांनी शुक्रवारी दुपारी पावणे चारवाजेचे सुमारास घरावर जाऊन विद्युत वाहिनीच्या पकडून जीवन संपवले. या घटनेमुळे वाहेगाव व भनगी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी रावसाहेब वामन पंडित (रा. वाहेगाव ता.जि. नांदेड) यांनी दिलेल्या माहितीन्वये नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पो. नि. ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोउपनि. उध्दव भारती याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.