जोरदार पावसामुळे उर्ध्वमानार धरणात आवक वाढली; विसर्ग वाढण्याच्या शक्यतेने सतर्कतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 14:07 IST2025-08-28T14:05:55+5:302025-08-28T14:07:56+5:30

सध्या उर्ध्वमानार धरणातून १५ दरवाज्याद्वारे ४७ हजार क्यूसेकपेक्षा अधिक विसर्ग सुरू आहे

Heavy rains increase inflow into Urdhvamanar dam; alert issued due to possibility of increased discharge | जोरदार पावसामुळे उर्ध्वमानार धरणात आवक वाढली; विसर्ग वाढण्याच्या शक्यतेने सतर्कतेचा इशारा 

जोरदार पावसामुळे उर्ध्वमानार धरणात आवक वाढली; विसर्ग वाढण्याच्या शक्यतेने सतर्कतेचा इशारा 

- गोविंद कदम
लोहा ( नांदेड) :
तालुक्यातील उर्ध्व मानार (लिंबोटी) धरण ९१ टक्के भरले आहे. मात्र, परिसरातील सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येव्यात वाढ होत आहे. त्यामुळे आधीच सुरू असलेल्या विसर्गात कधीही वाढ केली जाऊ शकते, असा इशारा तहसील प्रशासनाकडून देण्यात आला आहे. यासाठी तलाठ्यांमार्फत गावकऱ्यांना सावधानतेचा संदेश पोहोचविण्यात आला आहे.

लिंबोटी उर्ध्वमानार धरणाचे १५ दरवाजे प्रत्येकी १ मीटरने उघडण्यात आले असून, सध्या १३३५.१८ क्यूमेक (सुमारे ४७,१५१ क्यूसेक) इतका विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. धरणात सतत येवा वाढत असल्याने परिस्थितीनुसार विसर्ग आणखी वाढविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

धरण क्षेत्रातील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा 
देण्यात आला असून वाढत्या विसर्गामुळे लोहा व कंधार तालुक्यातील लिंबोटी, चोंडी, दगडसंगावी, मांजरे सांगवी, बोरी खु., उमरज, शेकापूर, घोडज, हणमंतवाडी, डोंगरगाव, संगमवाडी, कोल्ह्यांचीवाडी व इमामवाडी ही गावे पुराच्या धोक्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी सतर्क रहावे अफवांवर विश्वास ठेवू नये
लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी सांगितले आहे की, ''धरणात मोठ्या प्रमाणावर येवा होत आहे. त्यानुसार विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे निम्न भागातील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे व सतर्क राहावे. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. पुरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी उर्ध्वमानार प्रकल्प लिंबोटी येथे पुर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे,”

Web Title: Heavy rains increase inflow into Urdhvamanar dam; alert issued due to possibility of increased discharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.