छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच असून, पुन्हा १२९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे हाताशी आलेल्या पिकांचा चिखल झाला तर वस्त्यांमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे हजारो लोकांचे संसार उघड्यावर पडले. थोडक्यात सांगायचे झाले तर संपूर्ण खरीप हंगामाची मराठवाड्यात माती झाली. नुकसानीचे पंचनामे होतील; पण मिळणाऱ्या शासकीय मदतीतून झालेले नुकसान कधीच भरून येणार नाही.
बीडमध्ये पुन्हा ५७ मंडळांत अतिवृष्टीबीड जिल्ह्यात पावसाचे सत्र कायम असून, सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील ५७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस असाच पाऊस कायम राहण्याचा अंदाज वर्तवल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे, ज्यामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. यंदाच्या मान्सून हंगामात आतापर्यंत सरासरीच्या १३७.६ टक्के पाऊस झाला आहे.
परभणी जिल्ह्यात अनेक गावांना पुराचा वेढा, सेना दलाच्या पथकास पाचारणपरभणी जिल्ह्यात ५२ पैकी २२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून, गोदावरी, करपरा नदीकाठच्या अनेक गावांना पुराने वेढले आहे. पाथरी तालुक्यात गोदावरी नदीचे पाणी शेतशिवारात घुसल्याने नुकसान झाले आहे. दुधना, इंद्रायणी व पूर्णा नदीचाही काही ठिकाणी कहर पाहायला मिळाला. जिल्ह्यातील जवळपास २८ गावांचा संपर्क तुटल्याचे चित्र आहे, तर धरणांतून सुटणाऱ्या पाण्यामुळे अनेक गावांना पुराचा वेढा कायम राहण्याची भीती आहे. परभणी तालुक्यात इंद्रायणी नदीचे बॅकवॉटर गावात शिरल्याने इंदेवाडी ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागली.
लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊसलातूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मांजरा-तेरणा नदी संगमावर भीषण पूरस्थिती असून, २१ गावांचा संपर्क तुटला आहे.
हिंगोली रेकॉर्डब्रेक पावसाने पावणेतीन लाख हेक्टरवरील पिके बाधितहिंगोली : जिल्ह्याला यंदा पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तब्बल २ लाख ७१ हजार ५८६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, वीज पडून व पुरात वाहून गेल्याने ११ जणांना जीव गमवावा लागला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
धाराशिवला पुन्हा २१ मंडळांमध्ये अतिवृष्टीधाराशिव जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे. मंगळवारी रात्रीतून पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढले. तब्बल २१ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये पूर प्रभावित परंडा तालुक्यातील सर्वच पाचही मंडळांचा समावेश आहे. येथील पूरस्थिती कायम असल्याने एनडीआरएफ, सैन्यदलाच्या जवानांकडून मंगळवारीही पुरात अडकलेल्या नागरिकांचे बचाव कार्य सुरू होते. गेल्या आठवडाभरापासून धाराशिव जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस नांदेडातनांदेड जिल्ह्यात मराठवाड्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकूण १ हजार १३.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंतच्या सरासरीपेक्षाही १०० मि.मी. पाऊस अधिक झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात जवळपास २४ जणांचा विविध कारणांनी बळी गेला आहे. सध्या विष्णुपुरी प्रकल्पाचे १५ दरवाजे उघडून सव्वादोन लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.