संसार सोडून दुसरे लग्न केलं, पतीने शिकवला धडा; पत्नी, दुसऱ्या पतीसह नातेवाईकांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:29 IST2025-01-11T17:28:21+5:302025-01-11T17:29:33+5:30
पहिल्या पतीने शिकवला चांगलाच धडा; न्यायालयाच्या आदेशाने पत्नी, दुसऱ्या पतीसह दोघांच्या ११ नातेवाईकांवर गुन्हा

संसार सोडून दुसरे लग्न केलं, पतीने शिकवला धडा; पत्नी, दुसऱ्या पतीसह नातेवाईकांवर गुन्हा
अर्धापूर (नांदेड) : पहिल्या पतीसोबत संसार सुरू असताना, विश्वासघात करून दुसऱ्या पुरुषाशी विवाह करणे पत्नीला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह ११ नातेवाइकांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर सुरेश तरटे यांचा विवाह वैशाली भीमराव भोसले यांच्यासोबत २०१९ साली झाला होता. त्यानंतर वैशाली आणि मनोहर यांना मुलगा झाला. या दोघांचा संसार सुरू असताना, वैशाली व तीन वर्षांचा मुलगा यांनी मनोहरच्या घरातून पलायन केले. मनोहर तरटे यांनी आपली पत्नी आणि मुलाचा शोध घेतला, परंतु ते त्यांना कुठेही आढळून आले नाही. दरम्यान पत्नी वैशाली हिने अंकुश सांडू शिंदे ( रा. हट्टी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याशी दुसरा विवाह केला.
याबाबत अनेक वेळा पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही आरोपी विरुद्ध कारवाई झाली नाही. अखेर मनोहर तरटे यांनी अर्धापूर न्यायालयात धाव घेतली. मनोहर तरटे यांच्याकडून ॲड. शेख आमेर शेख सगीर यांनी पुरावे देत बाजू मांडली. आरोपी पत्नी वैशाली हिने पहिल्या पतीसोबत विश्वासघात करून दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसरा विवाह केल्यामुळे तिच्यासह नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायाधीश क्यू. आर. सय्यद यांनी दिले.
पत्नी, दूसरा पती अन् नातेवाईकही अडकले
फिर्यादी मनोहर तरटे यांच्या तक्रारीवरून आरोपी पत्नी वैशाली भोसले, दुसरा पती अंकुश शिंदे, आरोपी पत्नीचे वडील भीमराव भोसले, आई देवशाला भोसले, मावशी दीपाली भोसले, काका अभिमान भोसले, आजोबा जालिंदर भोसले, आजी देवकाबाई भोसले, रा. कोताळा, ता. मानवत, जि. परभणी, वैशालीच्या दुसऱ्या नवऱ्याचा भाऊ सुरेश शिंदे, वैशालीची दुसरी सासू कांताबाई शिंदे, वैशालीचा सासरे आजोबा सांडू शिंदे, अशा एकूण ११ इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास जमादार बोदमवाड हे करीत आहेत.