Gadaga Gram Panchayat scam: Officers, Administrations involve in scam | गडगा ग्रामपंचायत घोटाळा : पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी साधले स्वहित
गडगा ग्रामपंचायत घोटाळा : पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी साधले स्वहित

ठळक मुद्दे घोटाळेबाजांकडून गावाला बदनाम करण्याचे षड्यंत्र

- वसंत जाधव

गडगा : नायगाव तालुक्यातील गडगा ग्रामपंचायतीमधील चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतील लाखो रूपयांच्या घोटाळ्यात कार्यरत पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी सर्व नियम बाजूला ठेवून स्वहित सांभाळत गट्टी साधली अन् त्यामुळेच विकासकामांना सोडचिठ्ठी झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली बहुतांश कामे नियमबाह्य, अनियमितेत झाली़ यामुळे यास संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हितसंबंध होते की काय? अशा संशयाला जागा आहे. घोटाळेबाज मंडळींनी केवळ गावाला बदनाम करण्याचाच विडा उचलला आहे.
ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आलेल्या चौकशीत गडगा ग्रामपंचायतीमध्ये चौदाव्या वित्त आयोगातंर्गत करण्यात आलेली बहुतांश कामे नियमबाह्य पद्धतीने झाली आणि त्यात विद्यमान सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमताने अपहार केल्याची घटना उजेडात आली. ग्रा.पं.ने सी.सी.नाली बांधकाम २०१८-१९ व २०१९-२० या वित्तीय वर्षात केले असून सन २०१७-१८ या वर्षातील आराखड्यात घनकचरा व सांडपाणी या सदराखाली काम करण्यात आले. या कामास तांत्रिक, प्रशासकीय मान्यता घेण्यात आली असून झालेल्या कामाचे मूल्यांकन कनिष्ठ अभियंता जिरवनकर यांनी मोजमापपुस्तिका क्रमांक १८९९ पान क्रमांक ३७९६१५ ते ३७९६२० वर केले आहे. ज्याचे मूल्यांकन ८९३०४ एवढे करण्यात आलेले आहे. सरपंच, ग्रामसेवक यांनी सदरच्या कामावर ८७७२६ रुपये उचल केले आहे. या कामास उपअभियंता (बां) यांनी काम पूर्णत्वाचा दाखला दिलेला नाही. २४ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या कामाची पंचासमक्ष भौतिक तपासणी केली असता अंदाजे १३० फूट नालीचे काम तेही अर्धवट व निकृष्ट दर्जाचे केल्याचे दिसून आले. सदर नाली बांधकाम करत असताना एकच भिंत उभी केलेली असून रोड साईडला बांधकाम केले नाही. सदरचे कामबंद गटार असणे आवश्यक असता तसे केलेले नाही. त्यामुळे सदर नालीवर झालेला खर्च सरपंच, ग्रामसेवक व कनिष्ठ अभियंता यांच्याकडून वसूल करणे योग्य वाटते, असे अहवालात म्हटले आहे. 
सन २०१८-१९ व २०१९-२० या वित्तीय वर्षामध्ये ग्रामपंचायतीने दहा टक्के प्रशासकीय खर्चावर १७५००० रुपये एवढा खर्च केला आहे. २४ आॅक्टोबर २०१८ रोजी १ लाख ५० हजार रुपये जनरल किर्दीस वर्ग करण्यात आले. या रक्कमेतून फर्निचर खरेदी दोन लाकडी टेबल ४० हजार रुपयेप्रमाणे ८० हजार रुपयांची खरेदी केली आहे. सदरची खरेदी करताना दरपत्रके मागविण्यात आलेले नाहीत. साई फर्निचर वर्कर्स गडगा प्रो.प्रा.विश्वनाथ भीमराव पांचाळ यांच्याकडून सदर दोन टेबल (४९) चे बनविण्यात आले. बाजारभावानुसार सदरचा दर हा अतिशय महाग असल्याचे दिसून येते. या खरेदीस प्रशासकीय मान्यता घेण्यात आलेली नाही. सदरची खरेदी नियमबाह्य करण्यात आलेली असून ८० हजार रुपये सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून वसूलपात्र ठरतात. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी राहणीमान भत्ता व पगारापोटी तसेच बचत गट खर्च व प्रशासकीय असे एकूण ७० हजार रुपये खर्च केला. तो नियमबाह्य  आहे. ७ जून २०१९ रोजी सरपंचाचे चिरंजीव क्रांतीकुमार माधवराव कोंडलवाडे यांच्या नावे दहा हजार रुपयांचा धनादेश देवून महिला बचत गट प्रशिक्षकास राहणीमान भाडे व भोजन भत्ता या नावाखाली १०           हजारचा खर्च दर्शविला आहे. सदर खर्चाबाबत माहिती घेतली असता अशा प्रकारचा कोणताही खर्च करण्यात आला नसल्याची माहिती मिळाली. एकंदरीत दहा टक्के खर्च         १ लाख ५० हजार रुपये हे नियमबाह्य तसेच संशयाने अपहार झाल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे सदरील रक्कमदेखील सरपंच व ग्रामसेवक माने यांच्याकडून वसूलपात्र ठरते. असा स्पष्ट अहवाल देण्यात आला आहे.

पेव्हर ब्लॉकच्या कामाला अभियंत्यांकडून पूर्णत्वाचा दाखला नाही
ग्रा.पं.ने सन २०१९ या वर्षात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम केले. सदर कामास प्रशासकीय, तांत्रिक मान्यता घेतल्याचे पंजिकेवरुन निदर्शनास येते. सदरच्या कामावर ग्रा.पं.ने २ लाख ९४ हजार ७५४ रुपये खर्च केलेले असून उचल केलेल्या रक्कमेएवढे मूल्यांकन झालेले आहे. परंतु        उपअभियंता (बां) यांनी काम पूर्णत्वाचा दाखला दिलेला नाही. पंचासमक्ष केलेल्या भौतिक तपासणीत सदरचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नसून निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पंचांनी सांगून सदर कामाची उप- अभियंत्याकडून तपासणी करून फेरमूल्यांकन करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे फेरमूल्यांकन करणे योग्य वाटते. असे चौकशी अहवालात म्हटले आहे. अंगणवाडी व शालेय क्रीडा साहित्य खरेदीसाठी म्हणून या कामावर सन २०१९ यावर्षी २ लाख ७० हजार रुपये, तसेच शालेय क्रीडा साहित्यासाठी २ लाख ९० हजार रुपये असे एकूण ५ लाख ६० हजार रुपयांची खरेदी करण्यात आली. सदर खरेदी हे दरपत्रके मागवून तुलनात्मक  तक्ता तयार करून कमी दर असलेले पुरवठादार माहेश्वरी इंटरप्रायजेस नांदेड यांच्याकडून खरेदी करण्यात आली. परंतु, पुरवठाधारकास साहित्य खरेदीबाबत २ लाख ७० हजार रुपये धनादेशाद्वारे प्रदान न करता नियमबाह्य पद्धतीने नगदी स्वरूपात दिलेले आहेत. 

Web Title: Gadaga Gram Panchayat scam: Officers, Administrations involve in scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.