सोयरिक जमली, पण लग्नासाठी पैसे जमेनात म्हणून बापानेच केली मुलीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 19:35 IST2022-04-20T19:34:46+5:302022-04-20T19:35:22+5:30

आरोपी पिता सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

father killed his daughter as he did not have money for her marriage | सोयरिक जमली, पण लग्नासाठी पैसे जमेनात म्हणून बापानेच केली मुलीची हत्या

सोयरिक जमली, पण लग्नासाठी पैसे जमेनात म्हणून बापानेच केली मुलीची हत्या

मुखेड ( नांदेड ) : सोयरिक जमल्यानंतर लग्नाला पैसे मिळेनात म्हणून जन्मदात्या बापानेच मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी जामखेड येथे घडली आहे. बालाजी विश्वंभर देवकत्ते असे आरोपी पित्याचे नाव असून त्याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील जामखेड येथील बालाजी विश्वंभर देवकत्ते ( ४० ) शेती करतो. त्याच्या १८ वर्षाची मुलगी सिंधूताई हिची सोयरिक जमली आहे. काही दिवसांमध्ये लग्न करावे लागेल, मात्र हलाखीची परिस्थिती असल्याने पैसा कोठून जमणार या विवंचनेत देवकत्ते होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास, सिंधूताईस तुझ्या लग्नासाठी पैसे कोठून जमा करू, असा संताप व्यक्त करत शिवीगाळ सुरु केली. तसेच अचानक लाकडी दांडा डोक्यात घालून देवकत्ते याने पोटच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर पत्नीला देखील हातावर दांडा मारून जखमी केले.

माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, पोलिस उपनिरिक्षक नरहरी फड, गजानन अन्सापुरे, भारत जाधव, पोलिस जमादार सुनील पांडे, गंगाधर चिंचोरे, पोलिस अमलदार शिवाजी आडबे, सिद्धार्थ वाघमारे , फयाज शेख यांनी घटनेचा पंचनामा केला. आरोपीच्या पत्नीच्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असुन पोलिस त्याच्या शोधात आहेत. दरम्यान, घटनास्थळी  उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: father killed his daughter as he did not have money for her marriage