भोकर-नांदेड महामार्गावर रिक्षा- टेम्पोचा भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 17:54 IST2023-06-19T17:54:20+5:302023-06-19T17:54:43+5:30
सिताखांडी घाटात भरधाव टेम्पोची रिक्षास धडक; भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर जखमी

भोकर-नांदेड महामार्गावर रिक्षा- टेम्पोचा भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू
- राजेश वाघमारे
भोकर : तालुक्यातील नांदेड रस्त्यावरील सिताखांडी घाटात भरधाव टेम्पोने सीटर रिक्षास जोरदार धडक दिल्याची घटना आज दुपारी चार वाजता घडली. यात रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार प्रवासी गंभीर जखमी आहेत.
येथील नांदेड रस्त्यावरील सिताखांडी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव टेम्पोने ( क्र. एह एच १९ एस ४९९३) समोरुन नांदेड ते भोकर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षास (क्र. एम एच २६ बी एक्स ३८१५) जोरदार धडक दिली. दरम्यान, अपघाताचे भीषण दृश्य पाहून नागरिक, वाहनधारकांनी मदतीसाठी धाव घेतली. रिक्षाची समोरची पूर्णपणे दबली गेल्याने पत्रा कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. रिक्षातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमींना अधिक उपचारासाठी नांदेडकडे रवाना करण्यात आले आहे.
मृतांची नावे:
भुलाबाई गणेश जाधव (वय ४५ रा. पोटातांडा, ता. हिमायतनगर) , संदिप किशनराव किसवे (वय २६, रा. हळदा ता. भोकर), संजय ईरबा कदम ( वय ४८ रा. हिमायतनगर), बापुराव रामसिंग राठोड (वय ५७ रा. पाकीतांडा, ता. भोकर) आदी चार प्रवासी ठार झाले आहेत.
गंभीर जखमींची नावे:
परमेश्वर केशव महाजन (रा. इरसनी) कैलास गणपत गडमवार (रा. सिरंजणी ता. हिमायतनगर), मंगेश गोविंदराव डुकरे (वय २२ रा. लहान ता. अर्धापूर) आणि देवीदास गणेश जाधव ( रा. पोटातांडा) यांचा समावेश आहे.