मुलाच्या आरक्षणासाठी वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 10:21 IST2018-07-28T09:14:48+5:302018-07-28T10:21:59+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र लिहून एका व्यक्तीने फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुलाच्या आरक्षणासाठी वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र लिहून एका व्यक्तीने फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नांदेड तालुक्यातील पिंपळगाव (महादेव) येथील वारकरी संप्रदायातील मराठा समाज बांधव प्रल्हादराव कल्याणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावे चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पिंपळगाव येथील त्यांच्या राहत्या घराच्या छताच्या गजाला साडी बांधून गळ्याला फास देत छतावरून उडी घेतली. परंतु साडी बांधलेला गज वाकल्याने साडी निसटून ते खाली पडले. यानंतर त्यांना नांदेड येथील भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कल्याणकर यांनी आपल्या मुलाला आरक्षण नसल्यानेच सरकारी नोकरी मिळाली नाही. पुण्यात कंपनीत काम करावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे मी समाजासाठी जीव देत आहे. हिंसक आंदोलन जाळपोळ नको त्याने देशाचे नुकसान होते, ती आपलीच राष्ट्रीय संपत्ती आहे या आशयाचे त्यांनी पत्र लिहून ठेवले आहे. त्याचबरोबर शर्टच्या खिशावर व इतरत्र एक मराठा लाख मराठा, जय महाराष्ट्र असा मजकूर लिहिला आहे. शेवटी सर्व मंत्र्यांना प्रणाम असे लिखाण असून पत्र लिहिताना त्यांनी सरकारवर अजिबात टीका केली नाही. केवळ वारंवार आरक्षण द्या अशी विनवणी केली आहे.