माहूर यात्रेत बनावट नोटांचा सुळसुळाट! विधीसंघर्षित बालकाकडून पाचशेच्या ३९ नोटा जप्त, सूत्रधार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 19:41 IST2026-03-11T19:40:01+5:302026-03-11T19:41:57+5:30
विधीसंघर्षित बालकाच्या हाती कुणी दिल्या बनावट नोटा? व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

माहूर यात्रेत बनावट नोटांचा सुळसुळाट! विधीसंघर्षित बालकाकडून पाचशेच्या ३९ नोटा जप्त, सूत्रधार कोण?
- नितेश बनसोडे
माहूर (जि. नांदेड): माहूर शहरातील सोनापीर बाबा दर्गाह येथे सुरू असलेल्या उर्स यात्रेदरम्यान बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. माहूर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एका विधीसंघर्षित बालकासह एका व्यक्तीकडून १९ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या घटनेने शहरात आणि व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
असा झाला पर्दाफाश
१० मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पोलिसांनी उर्स यात्रेत पेट्रोलिंग करत असताना, क्रॉस झुल्यावरील तिकीट काउंटरवरील महिलेने एका मुलाबाबत संशय व्यक्त केला. तो मुलगा बनावट नोट देऊन तिकीट काढत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता ५०० रुपयांच्या ६ बनावट नोटा सापडल्या.
घराच्या झडतीत मोठे घबाड
मुलाच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याच्या नातेवाईकाच्या घराची झडती घेतली. यावेळी कपाटातील कपड्यांखाली ५०० रुपयांच्या ३३ बनावट नोटा (एकूण १६,५०० रुपये) आढळून आल्या. पोलिसांनी एकूण ३९ बनावट नोटा जप्त केल्या असून या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १७९ व १८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मोठ्या रॅकेटची शक्यता
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. अशा ठिकाणी बनावट नोटा खपवण्यासाठी विधीसंघर्षित बालकाचा वापर होणे, हे एखाद्या मोठ्या टोळीचे काम असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन मुख्य सूत्रधाराला पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलीस प्रशासनासमोर आहे.