मद्यधुंद शिक्षकाचा वर्गातच धिंगाणा, मुलांना शिवीगाळ; कारवाई करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 09:19 IST2025-12-07T09:18:05+5:302025-12-07T09:19:46+5:30
शेकापूर येथील जि.प. शाळेत कर्तव्यावर असलेले शिक्षक अनंत वर्मा यांचा शाळेतील गैरवर्तनाचा धक्कादायक व्हिडीओ समाजमाध्यमांवर फिरत आहे.

मद्यधुंद शिक्षकाचा वर्गातच धिंगाणा, मुलांना शिवीगाळ; कारवाई करण्याची मागणी
माहूर, (जि. नांदेड) : माहूर तालुक्यातील शेकापूर येथील जि.प. शाळेतील शिक्षकाने दारू पिऊन चक्क शाळेतच धिंगाणा घालताना विद्यार्थ्यांसोबतही गैरवर्तन केले. हा खळबळजनक प्रकार ५ डिसेंबर रोजी घडला असून शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या दारुड्या शिक्षकाला निलंबित करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
शेकापूर येथील जि.प. शाळेत कर्तव्यावर असलेले शिक्षक अनंत वर्मा यांचा शाळेतील गैरवर्तनाचा धक्कादायक व्हिडीओ समाजमाध्यमांवर फिरत आहे. सदरचा व्हिडीओ ५ डिसेंबर रोजीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षक अनंत वर्मा हे नेहमीप्रमाणेच शाळेत दारूच्या नशेत आले होते. त्यावेळी वर्गामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी त्यांच्याशी कथितरित्या अश्लील भाषेत बोलत होते. अधूनमधून विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जात विचित्र डान्स करत होते. ही सर्व बाब समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. शिक्षकाच्या अशा अवस्थेने शाळेतील विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहेत.