Drought In Marathwada : दुष्काळाच्या छायेने चौकी-धर्मापुरीत घरे कुलुपबंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 20:21 IST2018-11-23T20:14:38+5:302018-11-23T20:21:03+5:30
चौकी धर्मापुरी गावातील लोक पोट भरण्यासाठी स्थलांतरित होत आहेत.

Drought In Marathwada : दुष्काळाच्या छायेने चौकी-धर्मापुरीत घरे कुलुपबंद !
- गोविंद शिंदे, बारुळ जि. नांदेड
‘मानार प्रकल्प’ हा कंधारच नव्हे तर नायगाव, बिलोली, धर्माबाद या तालुक्यासाठी कामधेनू प्रकल्प म्हणून ओळखला जातो़ मात्र मागील तीन वर्षापासून हा प्रकल्प भरला नाही़ प्रकल्पाच्या भरवशावर असलेली २४ हजार हेक्टर बागायती जमीन आता कोरडवाहू बनली आहे़ तर दुसरीकडे मत्स्य व्यवसाय करणारे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी कर्नाटक, तेलंणात स्थलांतर करीत आहेत़ शेतकरी निसर्ग व शासनामुळे हतबल झाला आहे़
बारुळ येथील मानार प्रकल्प गेले तीन वर्षांपासून भरला नसल्याने या भागात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे़ प्रकल्पापासून एक कि़मी़ अंतरावरील चौकी धर्मापुरी गावातील लोक पोट भरण्यासाठी स्थलांतरित होत आहेत़
२२० मजूर ऊसतोड, वीट्टभट्टी, मच्छीमारी, मत्स्य व्यवसाय व इतर कामासाठी कर्नाटक, हैद्राबादकडे कुटुंबासह गेल्याने गावातील गल्ली, गाव ओसाड पडल्यासारखे दिसत आहे़ धर्मापुरी या गावाची कुटुंबसंख्या १२० असून येथील गावातील नागरिकांना शेती कमी आहे़ प्रकल्पाच्या काठावर वसलेल्या या गावाचा रोजगाराचा हा मच्छमारी आहे़ या प्रकल्पावर २४ हजार हेक्टर जमीन नेहमी बागायती असते़ पण निसर्गाच्या अवकृपेमुळे ही शेती आता कोरडवाहू बनली आहे़ धर्मापुरीसह तेलर, वरवंट, बारुळ, चिंचोली, बाचोटी, मंगनाळी आदी गावातील मच्छव्यवसाय करणारे व शेतकरी कामाच्या शोधात गाव सोडून गेले आहेत़
बळीराजा काय म्हणतो?
२२० मजूर परप्रांतात
मानार प्रकल्प तीन वर्षांपासून न भरल्याने रोजगारावर उपासमारीची वेळ आली आहे़ रोजगाराने बँकेचे, खाजगी कर्ज घेतल्याने हप्ते फेडण्यासाठी येथील २२० मजूर, शेतकरी कर्नाटक, हैद्राबाद कामाचा शोधसाठी गेले आहेत़
- बालाजी मेकलवाड (सरंपच)
गाव सोडण्याची पाळी
हाताला काम नसल्याने माणसे पोटाची खळगी भरण्यासाठी उसतोड, विटभट्टीच्या कामावर गेले आहेत. शासनाकडून रोजगाराची कामे दिल्या जात नाहीत. त्यामुळे गाव सोडण्याची वेळ आली आहे.
-जमुनाबाई डुबूकवाड
हाताला काम द्यावे
२० ते २५ गावातील भोई समाजासह इतर समाजही मच्छव्यवसाय करतो़ पण प्रकल्पातील अल्पसाठ्यामुळे आमच्या हाताला काम धंदा नाही़ शासनाने हाताला काम देण्याची सोय करावी़
- मुख्तार शेख (मच्छमारी व्यवसाय)