किरकोळ विक्रेत्यांना फटका
बिलोली - मागील दोन महिन्यांपासून आठवडी बाजार बंद असल्याने किरकोळ विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. भाजी विक्री करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांना भाजी विक्री होत नसल्याचा फटका सहन करावा लागत आहे.
नागरिकांत संताप
मुखेड - पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. पेट्रोलचे दर लिटरमागे १०० रुपयांपेक्षाही अधिक झाले. डिझेलही ९२ रुपयापर्यंत येऊन पोहोचले आहे. गॅसचे दर ८२५ रुपये झाले आहेत. एकूणच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर परिस्थिती जात असल्याचा आरोप आहे.
अतिक्रमणांचा अडथळा
भोकर - शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर किरकोळ अतिक्रमणे वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पालिका प्रशासनाने ही अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
खाद्यतेलाचे दर वाढले
धर्माबाद - मागील आठवडाभरापासून खाद्यतेलाचे भाव दररोज वाढत आहेत. सोमवारी सोयाबीन १५० रुपयांच्या वर जाऊन पोहोचले होते. तेलाच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसत आहे.
फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा
नायगाव - कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यातच फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडत आहे. सद्य:स्थितीत संसर्ग कमी झाला असला तरी येणाऱ्या काळात तो वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक झाले आहे.
माकपा पाळणार काळा दिवस
किनवट - मोदी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याने २६ मे रोजी माकपच्या वतीने काळा दिवस पाळला जाणार आहे. त्या अनुषंगाने माहूर तहसील कार्यालयासमोर काळ्या झेंड्यासह निदर्शने केली जाणार आहेत. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शंकर सिडाम, राजकुमार पडलवार, किशोर पवार, प्रल्हाद चव्हाण, बाबा डाखोरे, अमोल आडे, कैलास भरणे, वसंत राठोड आदींनी केले आहे.
उमरा येथे नाल्या भरल्या
लोहा - तालुक्यातील उमरा येथील नाल्या तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहत असून रस्त्यावर चिखल व डबके साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला. तापीचे रुग्ण वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले. आधीच कोरोना, त्यात अस्वच्छतेमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.
निवघ्यात खरेदीचा शुभारंभ
निवघा - येथे शेवंतामाता शेतकरी उत्पादक कंपनी व तृप्ती हर्बलच्या संयुक्त विद्यमाने अश्वगंधा वनस्पतीच्या खरेदीचा शुभारंभ २२ मे रोजी करण्यात आला. २० हजार रुपये प्रतिक्विंटल अश्वगंधाला भाव आहे, अशी माहिती शेवंतामाता शेतकरी गटाचे अध्यक्ष बालासाहेब कदम यांनी दिली. यावेळी बाबूराव कदम, सरपंच शरद कदम, उपसरपंच शाम पाटील, कोषाध्यक्ष शेखर पाटील, संचालक संभाराव लांडगे आदी उपस्थित होते.
जयंती घरातच साजरी करा
धर्माबाद- पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती ३१ मे रोजी आहे. समाजबांधवांनी घरातच जयंती साजरी करावी, असे आवाहन धनगर युवा मल्हार सेनेचे तालुकाध्यक्ष नागनाथ जिंकले यांनी केले. समाजबांधवांनी इमारत अथवा अंगणात पिवळे निशाण अथवा होळकरांचे निशाण फडकवावे, असे आवाहन त्यांनी केले.
झुंजारे यांनी सूत्रे स्वीकारली
कंधार - येथील पोलीस निरीक्षकपदी व्ही. के. झुंजारे यांची नियुक्ती झाली. त्यांनी रविवारी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वी झुंजारे यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहिले होते. पोलीस निरीक्षक पद मागील आठ महिन्यांपासून रिक्त होते. या जागेवर त्यांची नियुक्ती झाली.
जिल्हाध्यक्षपदी फुलारी
बारड - भाजपा मोदी संघ सपोर्टर युवा जिल्हाध्यक्षपदी सुरेश फुलारी जवळेकर यांची नियुक्ती झाली. यावेळी भाजपाचे किशोर देशमुख, नीलेश देशमुख, शंकर मुतलवाड, मुन्ना चांडक यांच्या नेतृत्वाखाली टीमने ही निवड केली. यावेळी जयश्री देशमुख, राकेश हेमके, उमाकांत लखे, अनिल गोणगे, सचिन खाडे, विलास कदम आदी उपस्थित होते.
तहसीलदारांनी घेतली बैठक
उमरी - मान्सूनपूर्व नियोजित कामासंदर्भात तहसीलदार माधव बोथीकर यांनी संबंधित अधिकारी, विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी नायब तहसीलदार गिरीश सगकळवाड, गटविकास अधिकारी नारवाडकर, पोलीस निरीक्षक मोहन भोसले, प्रभारी तालुका कृषी अधिकारी जाधव, वीज वितरण कंपनीचे व्ही. एम. मठपती, डॉ. एम. एम. कस्तुरे आदी उपस्थित होते.
प्रवक्तेपदी अशोक लोणीकर
मुखेड - मुक्रमाबाद येथील अशोक लोणीकर यांची लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या जिल्हा प्रवक्तेपदी नियुक्ती झाली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी रजाक कुरेशी, जलील पठाण, मुन्ना सुवर्णकार, गणेश आकुलवार आदी उपस्थित होते.
तालुकाध्यक्षपदी वारघडे
बिलोली - भारतीय बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्षपदी बालाजी वारघडे यांची, तर सरचिटणीसपदी नागोराव वाघमारे यांची निवड करण्यात आली. २२ मे रोजी जिल्हाध्यक्ष टी. एम. वाघमारे, कोषाध्यक्ष धम्मपाल बनसोडे, संस्कार सचिव दरबारे यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
उमरीत आज रक्तदान शिबिर
उमरी - येथील टायगर ग्रुपच्या वतीने २६ मे रोजी कारेगाव पॉईंट हनुमान मंदिर परिसर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी इतर समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमास तहसीलदार माधवराव बोथीकर, पोलीस निरीक्षक भोसले, टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बाळू जाधव, शिवसेनेचे सुभाष पेरेवार, छावाचे राजेश जाधव, संघटनेचे तालुकाध्यक्ष साई खांडरे, अनिल खांडरे, संदीप पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
सिडकोचा संघ प्रथम
नांदेड - येथील स्वरानंद संगीत शिक्षण संस्था आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन अभंग गायन स्पर्धेत सिडको नवीन नांदेडचा संघ प्रथम आला. या संघात गजानन कुलकर्णी, प्रा. संतोष देशमुख, बाळू गिरी, चंद्रशेखर कहाळेकर यांनी सहभाग नोंदवला होता. संयोजक सदानंद मगर होते.