एका मिनिटांमध्ये ३ लाख ५० हजार पळवले; एटीएममध्ये रोकड भरताना चोरट्यांची 'धूम' स्टाईल चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 18:26 IST2021-11-08T18:21:53+5:302021-11-08T18:26:05+5:30
ATM Theft: छऱ्याच्या बंदुकीचा वापर करून कर्मचाऱ्यास धमकावत पळवली रक्कम

एका मिनिटांमध्ये ३ लाख ५० हजार पळवले; एटीएममध्ये रोकड भरताना चोरट्यांची 'धूम' स्टाईल चोरी
- गोविंद टेकाळे
अर्धापूर : शहरातील एटीएम मशीनमध्ये रोकड भरताना छऱ्याची बंदूक दाखवत धाडसी चोरी केल्याची घटना आज दुपारी घडली. केवळ एका मिनिटात चोरट्यांनी तब्बल ३ लाख ५० हजार रुपये हिसकावुन घेत स्पोर्ट बाईकवरून पळ काढला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुख्य रस्त्यावर बसवेश्वर चौकात वानखेडे कॉम्प्लेक्स येथे इंडिया-१ हे खाजगी कंपनीचे एटीएम आहे. आज दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास एटीएम मशीनमध्ये रोकड भरण्यासाठी मुक्तारोद्दीन गौस महेनोद्दीन गौस ( रा.माणिकनगर नांदेड ) हा कर्मचारी आला. यावेळी दोन चोरट्यांनी एटीएम समोर स्पोर्ट बाईक उभी केली. एकजण आत गेला आणि कर्मचाऱ्यावर बंदुकीतून छऱ्याचा मारा केला. जखमी अवस्थेतील कर्मचाऱ्याच्या हातातील रोकड असलेल्या पिशवी घेऊन पळ काढत बाहेर उभ्या दुचाकीवरून पळ काढला. पिशवीत ३ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती आहे. चोरी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. चोरीची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधिकक्षक विजय कबाडे,उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंदर्भात सुचना दिल्या.पोलिस निरीक्षक अशोक जाधव,पोलिस उपनिरीक्षक महमंद तयब्ब, सपो उपनि विद्यासागर वैद्ये, जमादार भिमराव राठोड,गुरूद्वारा आरेवार,महेंद्र डांगे पुढील तपास करत आहेत.
एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर
या परिसरात चोरीची ही दुसरी घटना आहे. एटीएमवर सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी अशी सूचना पोलिस प्रशासनाने वारंवार देऊनही संबंधितांनी कोणतीही उपाययोजना केल्या नाहीत.
या चोरी प्रकरणी पोलिस बारकाईने तपास करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन जलदगतीने कार्य करत आहे.
- विजय कबाडे, अतिरिक्त पोलिस अधिकक्षक नांदेड