Nanded: रेल्वे क्लर्कची बनावट ऑर्डर देत उत्तरप्रदेशात बोलावले; बेरोजगारांना १ कोटीस फसवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 17:17 IST2025-05-02T17:07:01+5:302025-05-02T17:17:37+5:30
नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक तरुणांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटची मोठी व्याप्ती असण्याची शक्यता आहे.

Nanded: रेल्वे क्लर्कची बनावट ऑर्डर देत उत्तरप्रदेशात बोलावले; बेरोजगारांना १ कोटीस फसवले
किनवट ( नांदेड) : दिल्ली येथे रेल्वे विभागात क्लर्कच्या जागेवर नोकरी लावतो म्हणून सुभाषनगर येथील तरुणांकडून १ कोटी ११ लाख ८६ हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नवी दिल्ली येथील दोघांसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक तरुणांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटची मोठी व्याप्ती असण्याची शक्यता आहे.
रेल्वे विभागात कमर्शिअल क्लर्कच्या जागा आहेत. आम्ही डीआरएम कार्यालय नवी दिली येथे जागा भरण्याचे काम करतो. पण अगोदर रक्कम द्यावी लागेल, खात्रीशीर काम होईल, असे सांगत आरोपी हरेंद्र भारती व आशिष पांडे तसेच डीआरएम कार्यालय नवी दिल्ली येथील काही कर्मचाऱ्यांनी किनवट येथील गजानन बाबू जाधव तसेच अन्य तरुणांकडून १ कोटी ११ लाख ८६ हजार रुपये उकळले. गजानन व त्यांचे वडील तसेच त्यांच्या मित्रांकडून ६ एप्रिल २०२४ ते १२ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत वेळोवेळी रक्कम आरोपींनी घेतली. गजानन व इतर मुलांना भारतीय रेल्वे विभागाचे बनावट ई-मेल वरून बनावट मेडिकलचे पत्र, जॉईनिंग लेटर पाठविले.
ट्रेनिंगसाठी उत्तर प्रदेशात बोलावून घेतले
एवढेच नव्हे तर गजानन जाधव व इतर मुलांना ४५ दिवसाचे प्रशिक्षण देण्याचे सांगून बनावट आयडी कार्ड व साहित्य देऊन त्यांना उत्तर प्रदेशातील हापूर रेल्वे स्टेशन येथे पाठविले. तेथे एक व्यक्ती त्यांची हजेरी घेऊन परत दुसरे दिवशी येण्याचे सांगत होता. गजानन व इतर मुले २० दिवस तेथे राहिले. परंतु कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नाही. याविषयी फोन केला असता फोन बंद आढळून आला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर गजाननने किनवट पोलिस स्टेशन गाठले. पोलिस निरीक्षक देवीदास चोपडे यांनी चौकशी करून गुरुवारी रात्री आरोपी हरेंद्र भारती, आशिष पांडे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केला आहे.