मुखेड येथे मळणीयंत्रात अडकून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 16:51 IST2018-09-06T16:49:59+5:302018-09-06T16:51:03+5:30
शेतात काम करत असताना मळणीयंत्रामध्ये अडकून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बेळी (बु) येथे आज सकाळी ११. ३० वाजता घडली.

मुखेड येथे मळणीयंत्रात अडकून तरुणाचा मृत्यू
मुखेड ( नांदेड ) : शेतात काम करत असताना मळणीयंत्रामध्ये अडकून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बेळी (बु) येथे आज सकाळी ११. ३० वाजता घडली. मनोज हनमंत जुन्ने (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुखेड येथील उमेश पांडुरंग राठोड यांच्या मळणीयंत्रावर मनोज जुन्ने हा महिनेवारीने काम करत असे. आज सकाळी तो बेळी (बु) येथील माधव मलिकार्जुन कोटेवाड यांच्या शेतात उडीद काढण्यासाठी मळणीयंत्र घेऊन गेला होता. मनोज सोबत शेतमालकाची दोन मुले पण कामाला होती. यावेळी मनोज वर थांबून उडदाचे काड यंत्रात लोटत होता. अचानक त्याचा हात यंत्रामध्ये अडकला गेला. पाहतापाहता मनोज आत ओढला गेला आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. याची माहिती मिळताच मुखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि प्रकाश सांगळे यांनी यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
मनोज मळणीयंत्रात बुडून मृत झाल्याची माहिती सर्वत्र पसरताच शेतात मोठा जनसमुदाय जमा झाला. मनोजच्या शरीराचे तुकडे तुकडे झाल्याने मळणीयंत्र खोलून ते काढावे लागले. डॉक्टरांनी घटनास्थळी येऊन शवविच्छेदन केले. त्याच्या पश्चात आई-वडील दोन लहान भाऊ असा परिवार आहे. माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जि.प. सदस्य संतोष राठोड, बालाजी पाटील कार्लेकर, माधव साठे, संजय बेळिकर, सुरेश जुन्ने, नागनाथ जुन्ने आदींनी घटनास्थळी भेट दिली.