आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:59 IST2019-04-29T23:57:02+5:302019-04-29T23:59:14+5:30
तालुक्यातील गोकुंदा येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील बी. ए. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा शौचालयात पडून मृत्यू झाल्याची घटना २८ एप्रिल रोजी उघडकीस आली.

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्याचा मृत्यू
किनवट : तालुक्यातील गोकुंदा येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील बी. ए. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा शौचालयात पडून मृत्यू झाल्याची घटना २८ एप्रिल रोजी उघडकीस आली. या विद्यार्थ्याची २९ एप्रिल रोजी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ईनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार व पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील अंधवाडी येथील उद्धव रामजी मालकुलवाड हा गोकुंदा येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात होता. तो सरस्वती विद्यामंदिर महाविद्यालयात बी. ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.
२८ रोजी तो उन्हातून प्रवास करून आला आणि शौचालयात सायंकाळी गेला. तो बाहेर आलाच नाही ही बाब कळल्यानंतर शौचालयाचा दरवाजा उघडल्यानंतर तो मृतावस्थेत पडून होता दारूच्या नशेत शौचालयात पडला असावा अशी शक्यता पोलिसांत खबर देणाऱ्या वसतिगृहाच्या लिपीकाने म्हटले आहे.
आदिवासी वसतिगृहातील या विद्यार्थ्याचा मृत्यू नेमका कशाने झाला? उष्माघाताने की अन्य कोणत्या कारणाने झाला, याची उकल झाली नसली तरी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ईनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आल्याचे पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सूत्रांनी माहिती देताना सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यची नोंद केली आहे .
वॉर्डन, चौकीदार दोघेही निलंबित
- या प्रकरणी वसतिगृहाचे वॉर्डन पी. एन. वडजे व एका चौकीदारावर निलंबनाची कारवाई केली आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
- महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळेल आज नेमका मृत्यू कशाने झाला हे सांगणे कठीण आहे, असे ते म्हणाले. एपीआय विजयकुमार कांबळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे.
- सदर विद्यार्थ्याचे शवविच्छेदन इनकॅमेरा झाल्याची माहिती पोलीस तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. त्याचवेळी शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र सदर विद्यार्थ्याचे शवविच्छेदन इनकॅमेरा झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे इनकॅमेरा शवविच्छेदनाचे नेमके सत्य काय? हा प्रश्नच आहे.