हदगावात धाडसी घरफोडी; वृद्धाचे हातपाय बांधून ३० तोळे सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 14:49 IST2020-07-24T14:47:18+5:302020-07-24T14:49:06+5:30
कपाटातील ३० तोळे सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम लंपास करत चोरट्यांनी धुम ठोकली.

हदगावात धाडसी घरफोडी; वृद्धाचे हातपाय बांधून ३० तोळे सोने लंपास
हदगाव (वार्ताहर) : शहरातील मुख्य रस्त्यावर व पोलीस स्टेशनपासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावरच घरफोडीची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. पाच चोरट्यांनी घरमालकाचे हातपाय व तोंड बांधून जिवे मारण्याची धमकी देत जवळपास ३० तोळे सोने लंपास केले आहे.
हरीप्रसाद सारडा असे घर मालकाचे नाव आहे. अयोध्या निवास स्थानी सारडा आणि एक मोलकरीण राहतात. गुरुवारी रात्री सारडा जेवण करुन पहिल्या मजल्यावर झोपले होते. रात्री २ वाजता घराच्या दारावर थाप मारल्याचा आवाज आल्याने त्यांनी दार उघडले. दार उघडताच चार ते पाच युवकांनी त्यांना धक्का देऊन घरात प्रवेश केला. ''सोना कहाँ है... चाबी जल्दी दे...वर्ना जान से हात धोयेगा'' असे धमकावत त्यांचे व मोलकरणीचे हातपाय व तोंड बांधले. कपाटातील ३० तोळे सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम लंपास करत धुम ठोकली.
हरीप्रसाद सारडा यांच्या फिर्यादीवरून हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी श्वान पथक व ठस्से तज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, पावसामुळे सुगावा लागला नाही. उपविभागीय पोलिस अधिकारी एस. एस. पाटील यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक अवधूत कुसे, सपोनी शंकर पांढरे पुढील तपास करत आहेत.