शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी तोबा गर्दी; दुसरीकडे बंडखोरांच्या मनधरणीची कसरत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:48 IST2025-11-17T12:46:40+5:302025-11-17T12:48:25+5:30
बंडखोर-नाराजांची मनधरणी तर दुसरीकडे अर्ज दाखल करण्याची लगबग

शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी तोबा गर्दी; दुसरीकडे बंडखोरांच्या मनधरणीची कसरत!
- गोविंद कदम
लोहा : नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (१७ नोव्हेंबर) शेवटचा दिवस असल्याने नगरपरिषद कार्यालयात सकाळपासूनच उमेदवार आणि कार्यकर्त्यांची तोबा गर्दी झाली आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने सर्वपक्षीय, अपक्ष इच्छुक उमेदवार समर्थकांसह दाखल झाले आहेत.
सकाळी दहा वाजल्यापासूनच समर्थकांच्या घोषणा आणि उत्साहाने परिसर दुमदुमला होता. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू असल्याने नगरपरिषद परिसरात गडबडगोंधळाचे चित्र पाहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवार आपल्या अर्जासाठी रांगेत उभे राहून प्रतीक्षा करताना दिसले.
दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असले तरी नगरसेवक पदांसाठी अनेक इच्छुक मैदानात उतरले आहेत. प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांची हालचाल सुरू असून शेवटच्या क्षणापर्यंत चर्चासत्रे आणि रणनीती आखण्याचे सत्र रंगले. तसेच बंडखोर आणि नाराजांची मनधरणी करण्यात वरिष्ठ नेते व्यस्त असल्याचे दिसले.
प्रक्रिया सुरळीत
निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या नियोजनामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडत आहे.