कफ सिरप छोट्यांचे असो की मोठ्यांचे, डॉक्टरांच्या चिठ्ठीविना नाही मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 20:00 IST2025-12-09T20:00:39+5:302025-12-09T20:00:48+5:30
चिठ्ठीविना औषध देणाऱ्यांवर कारवाई अटळ : तोकड्या यंत्रणेतही कसून तपासणी होणार

कफ सिरप छोट्यांचे असो की मोठ्यांचे, डॉक्टरांच्या चिठ्ठीविना नाही मिळणार
नांदेड : लहान मुलांसाठीच्या कफ सिरपची विक्री डॉक्टरांच्या वैध चिठ्ठीशिवाय करू नये, असा स्पष्ट सरकारी आदेश असतानाही त्याची सर्रास विक्री होत असल्याचे चित्र आहे. औषधी चिठ्ठीविना कुणी विक्री करताना आढळले तर त्या दुकानावर कारवाई केली जाणार आहे. परंतु कफ सिरप छोट्यांचे असो की मोठ्यांचे ते डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देऊ नये. कफ सिरपमध्ये असलेल्या काही घटकांच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र, राज्यभरात औषध विक्री दुकानांची संख्या लाखांमध्ये असताना औषध विक्री नियमांनुसार होते की नाही, हे तपासण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडे औषधी निरीक्षकांची संख्या अत्यंत तोकडी आहे. मात्र, आता कफ सिरप घेण्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी लागेल.
कशामुळे घेतला निर्णय ?
कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्याने आता सरकार कठोर निर्णय घेत आहे. विनापरवानगीने औषधविक्री करणे कुणाच्याही जिवावर बेतू शकते. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कफ सिरपचा वापर अनेक तरुण मंडळी नशा करण्यासाठी करतात. त्यांच्यावर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉक्टरांच्या चिठ्ठीविनाच कफ सिरपची विक्री...
लहान मुलांसाठीच्या कफ सिरपसह अनेक औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जात आहेत. नियमानुसार डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विकणे कायद्याचे उल्लंघन आहे. जिल्ह्यात घाऊक व किरकोळ मिळून जवळपास ५०० औषधी दुकाने आहेत. या सर्व दुकानांची नियमित आणि प्रभावी तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक चिठ्ठीचा रेकॉर्ड ठेवावा लागणार आहे.
३० परवाने निलंबित; ८ परवाने रद्द....
अन्न व औषध प्रशासनाने सन २०२५ मध्ये ३० किरकोळ विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच इतर ८ परवाने रद्द केले आहेत. नियमात राहून व्यवसाय करावा, असाच संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
- अशोक राठोड, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (एफडीए)
कफ सिरफचा अतिरेक ठरू शकतो धोक्याचा...
साधा थोडासा खोकला झाला तरी अनेकजण कफ सिरप पितात. मात्र कफ सिरपचा अतिरेक हा धोक्याचा ठरू शकतो, त्यामुळे उठसूट कफ सिरप पिण्याचे टाळणे गरजेचे आहे. साधारणतः खोकला झाला तर आपण डॉक्टरांना न दाखवता कफ सिरप घेण्यास पसंती देत असतो. मात्र सतत कफ सिरपचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरांना न विचारता कफ सिरप घेणे टाळणे गरजेचे आहे.
- डॉ. सुनील कांबळे, हृदयरोगतज्ज्ञ, नांदेड
नवीन वर्षात ‘फ्लाइंग स्क्वॉड’ येणार...
औषधविक्री नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी नवीन वर्षात ‘फ्लाइंग स्क्वॉड’ (फिरती तपासणी पथके) तयार करण्याची योजना ‘एफडीए’ विभागाकडून आखली जात आहे.