नांदेडमध्ये ७३ जागा टिकविण्याचे काँग्रेसपुढे आव्हान; अशोकराव चव्हाण कितपत कमळ फुलवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:08 IST2025-12-16T13:06:01+5:302025-12-16T13:08:18+5:30

मनपा निवडणूक : अशोकराव चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर पहिल्यांदाच होणार निवडणूक

Congress faces challenge to retain 73 seats in Nanded-Waghala Municipal Corporation Election ; Will Ashokrao Chavan make the lotus bloom? | नांदेडमध्ये ७३ जागा टिकविण्याचे काँग्रेसपुढे आव्हान; अशोकराव चव्हाण कितपत कमळ फुलवणार?

नांदेडमध्ये ७३ जागा टिकविण्याचे काँग्रेसपुढे आव्हान; अशोकराव चव्हाण कितपत कमळ फुलवणार?

- श्रीनिवास भोसले
नांदेड :
मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तापलेल्या राजकीय वातावरणात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर पहिल्यांदाच ही मनपा निवडणूक होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २०१७ मध्ये मिळविलेल्या ७३ जागा टिकविण्याचे आव्हान विद्यमान काँग्रेस नेतृत्वासह खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्यापुढे आहे. त्याचबरोबर भाजपमध्ये गेलेले अशोकराव चव्हाण नांदेडमध्ये कमळ कितपत फुलवू शकतात, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी अशोकराव चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यावेळी ८१ पैकी तब्बल ७३ जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकला होता. भाजपला ६, शिवसेनेला १ आणि एका अपक्ष उमेदवाराला यश मिळाले होते. स्वतंत्र लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांना खातेही उघडता आले नव्हते. दरम्यान, २०२२ मध्ये मनपाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने प्रशासकराज लागू झाले. त्यानंतर आता सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सध्याच्या रणधुमाळीत अनेक पक्ष स्वतंत्र लढण्याची भाषा करत असले, तरी राज्य पातळीवरील निर्णयांवर अंतिम समीकरणे अवलंबून असणार आहेत.

राष्ट्रवादीसमोर ‘भोपळा फोडण्याचे’ आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस आता दोन गटांत विभागली गेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीसमोर मनपा निवडणुकीत भोपळा फोडण्याचे आव्हान आहे. सध्या अशोकराव चव्हाण भाजपमध्ये असून, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. दोन्ही खासदारांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून जोरदार तयारी सुरू असून, कोणत्याही परिस्थितीत नांदेड मनपावर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही स्वतंत्र लढण्याची तयारी चालविली आहे. महापालिका क्षेत्रात येणाऱ्या नांदेड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मनपावर भगवा फडकविण्यासाठी आमदार बालाजीराव कल्याणकर आणि आमदार आनंद बोंढारकर यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्यापुढे मनपात राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’ची टिकटिक पुन्हा सुरू करण्याचे आव्हान असणार आहे.

वंचितची भूमिका ठरणार निर्णायक
महापालिका क्षेत्रात दलित व मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि मनसे यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. काँग्रेसकडून स्वतंत्र लढण्याची भूमिका मांडली जात असताना, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) कोणती भूमिका घेतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title : नांदेड़ नगर निगम चुनाव: कांग्रेस के सामने चुनौती, चव्हाण की बीजेपी का प्रभाव?

Web Summary : अशोक चव्हाण के दल-बदल के बाद नांदेड़ नगर निगम चुनाव में सरगर्मी। कांग्रेस को भाजपा के खिलाफ 73 सीटें बचानी हैं। राकांपा आंतरिक चुनौतियों का सामना कर रही है। दलित और मुस्लिम वोट निर्णायक। राजनीतिक गठबंधनों पर सबकी निगाहें।

Web Title : Nanded Municipal Elections: Congress faces challenge, Chavan's BJP impact?

Web Summary : Nanded Municipal Corporation elections heat up after Ashok Chavan's defection. Congress defends 73 seats against BJP. NCP faces internal challenges. Dalit and Muslim votes crucial. All eyes on political alliances.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.