Both of them were beaten to death in college | जाब विचारणाऱ्या दोघांना महाविद्यालयात डांबून मारहाण
जाब विचारणाऱ्या दोघांना महाविद्यालयात डांबून मारहाण

ठळक मुद्देसात जणांवर गुन्हा दाखल योजनेच्या लाभासाठी एटीएम, पासबुक घेतले हिसकावून

नांदेड : केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाल योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामला प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थिनीचे संस्थेतील काही जणांनी एटीएम आणि पासबुक ठेवून घेतले होते़ त्यातून त्यांनी व्यवहार केल्यानंतर विद्यार्थिनीच्या भावाने याबाबत त्यांना जाब विचारताच दोघांना जबर मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली़ याप्रकरणी सात जणांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
स्वाती अशोक सूर्यवंशी या विद्यार्थिनीने दिनदयाल योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता़ त्यानंतर संस्थेचे प्रभारी संजय मस्के आणि इंगोले यांनी प्रमाणपत्र नोंदविण्याची भीती दाखवित स्वाती यांचे पासबुक आणि एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून घेतले होते़ स्वातीला कुठलीही कल्पना न देता तिच्या खात्यातून व्यवहार करण्यात आले़ ही बाब स्वातीचा भाऊ चंद्रकांत सूर्यवंशी यांना समजल्यानंतर ६ जून रोजी ते संस्थेच्या कार्यालयात गेले होते़ यावेळी त्यांनी मस्के आणि इंगोले यांना एटीएम कार्ड आणि पासबुक का ठेवून घेतले? याबाबत विचारणा केली़ तसेच तसा शासन आदेश आहे काय? अशी चौकशी केली़
परंतु यावेळी सूर्यवंशी यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली़ संस्थेच्या अध्यक्षाला भेटू देण्याची त्यांनी विनंती केली़ परंतु, त्यासाठी त्यांना प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले़ थोड्याच वेळात त्या ठिकाणी आलेल्या इतर चार ते पाच जणांनी सूर्यवंशी त्यांचा मित्र संदीप गजभारे यांना जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली़
याप्रकरणी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय मस्के, इंगोले यासह इतर पाच जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मारहाणीच्या घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.
दिनदयाळ योजनेबाबत प्रश्नचिन्ह
केंद्र शासनाच्या वतीने युवकांना तांत्रिक मार्गदर्शन देवून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी दिनदयाळ पंडित डेव्हलपमेंट कार्यक्रम राबविण्यात येतो. मात्र लाभार्थी प्रशिक्षणार्थिचे पासबुक आणि एटीएम कार्ड काढून घेतल्याचा प्रकार या घटनेतून पुढे आल्याने सदर योजनेबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या योजनेच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.


Web Title: Both of them were beaten to death in college
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.