बोंढारच्या अक्षय भालेराव खून प्रकरणातील नववा आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 20:17 IST2023-06-24T20:15:38+5:302023-06-24T20:17:50+5:30
अक्षय श्रावण भालेराव याचा १ जून रोजी निर्घृणपणे खून करण्यात आला होता.

बोंढारच्या अक्षय भालेराव खून प्रकरणातील नववा आरोपी गजाआड
नांदेड: बोंढार येथील अक्षय भालेराव खून प्रकरणातील नववा आरोपीस नांदेड ग्रामीण पोलिसांनी अखेर गजाआड केले. बाबूराव तिडके असे आरोपीचे नाव आहे.
नांदेड शहरालगतच असलेल्या बोंढार तर्फे हवेली येथील २७ वर्षीय तरूण अक्षय श्रावण भालेराव याचा जातीय शिवीगाळ करून १ जून रोजी संध्याकाळी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील एकूण ९ आरोपींपैकी सात आरोपींना उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव व त्यांचे अन्य सहकारी अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांच्यासह गुन्हे शोधपथकाचे पोउपनि. आनंद बिचेवार, पोउपनि. महेश कोरे आदींनी यापूर्वीच जेरबंद करून गजाआड केले.
दरम्यान, या खून प्रकरणातील दोन आरोपी फरार झाले होते. फरार असलेल्या दोनपैकी बालाजी मुंगलच्या पोलिसांनी ४ जून रोजी मुसक्या आवळल्या. बाबुराव तिडके हा आरोपी मात्र, तब्बल २३ दिवसांपासून फरार होता. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी बाबुराव तिडके यास आज गजाआड केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.