अनैतिक संबंधाचा रक्तरंजित शेवट; शेतकऱ्याचा शेतातच आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:33 IST2025-07-05T17:32:29+5:302025-07-05T17:33:12+5:30
अनैतिक संबंधातून खून झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

अनैतिक संबंधाचा रक्तरंजित शेवट; शेतकऱ्याचा शेतातच आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
हदगाव (जि. नांदेड): डोरली गावात अनैतिक संबंधातून खुनाची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कैलास विश्वनाथ काटेकर (वय ३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अनैतिक संबंधातून दोन युवकांनी धारदार शस्त्राने काटेकर यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
दि. ४ रोजी रात्री कैलास काटेकर हे नेहमीप्रमाणे शेतात पिकाचे राखण करण्यासाठी गेले होते. मात्र, सकाळी घरी परतले नसल्यामुळे पत्नी शितल जेवणाचा डबा घेऊन शेतात गेल्या. येथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पतीचा मृतदेह आढळून आल्याने त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने नातेवाईकांना व पोलिसांना घटनेची माहिती दिली.घटनास्थळी तपास करताना शेतातील टिनशेडमधील फॅनवरही रक्ताचे डाग आढळले. आरोपींनी एकटाच शेतात असलेली संधी साधून खून केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार हदगाव पोलिसांनी तपास सुरू केला.
दरम्यान, पोलिसांना काही दिवसांपूर्वी गावातील दोन तरुणांशी मयताचे भांडण झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नारायण टोकलवाड व सुरेश शिवाजी सिरसाठ (२५) या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात मुख्य आरोपी नारायण गंगाधर टोकलवाड (२८) याच्या नात्यातील महिलेशी मयताचे अनैतिक संबंध होते, हा राग मनात धरून खून निर्घृणपणे खून केला.
या प्रकरणी शितल कैलास काटेकर यांच्या तक्रारीवरून हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी संकेत दिघे करीत आहेत. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.