कोंबड्या, पक्ष्यांनंतर आता शेकडो मधमाशांचा मृत्यू; नांदेडमध्ये खळबळ!
By मोरेश्वर येरम | Updated: January 11, 2021 15:57 IST2021-01-11T15:56:56+5:302021-01-11T15:57:56+5:30
नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात शेकडो मधमाशा मृतावस्थेत आढळल्या आहेत.

कोंबड्या, पक्ष्यांनंतर आता शेकडो मधमाशांचा मृत्यू; नांदेडमध्ये खळबळ!
नांदेड
राज्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव झाला असून आतापर्यंत कोंबड्या, कावळे, पोपट मृतावस्थेत आढळ्याचं समोर आलं होतं. आता नांदेडमध्ये शेकडो मधमाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात शेकडो मधमाशा मृतावस्थेत आढळल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 'बर्ड फ्लू'मुळेच या मधमाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नांदेडच्याच चिंचोर्डी गावात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मधमाशांच्या मृत्यूची घटना समोर आल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. चिंचोर्डीमध्ये तीन पोल्ट्री व्यावसायिकांच्या शंभर कोंबड्या दगावल्या होत्या. कोंबड्यांना दफन करून याबाबतची सूचना पशुसंवर्धन विभागाला देण्यात आली होती.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात तब्बल ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्यानंतर आता इतर जिल्ह्यातही या रोगाचा शिरकाव झाला आहे. राज्यात मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या ठिकाणी बर्ड फ्लू या रोगाचा संसर्ग झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई, ठाण्यात पक्षी मृतावस्थेत सापडून आले होते.