रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; आता आरामात मिळणार जागा, सहा गाड्यांच्या कोचेसमध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:44 IST2025-11-10T17:43:28+5:302025-11-10T17:44:24+5:30
कोचेस वाढ केलेल्या गाड्यामध्ये नांदेड- मनमाड गाडीचाही समावेश आहे.

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; आता आरामात मिळणार जागा, सहा गाड्यांच्या कोचेसमध्ये वाढ
नांदेड : दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागात मागील काही दिवसांपासून रेल्वेला मोठी गर्दी होत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता नांदेड विभागातील सहा रेल्वे गाड्यांना अधिकचे चार जनरल कोचेस बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कायमस्वरूपी चार जनरल कोचेस वाढविलेल्या गाड्यांची रचना पूर्वीच्या १२ कोचेसवरून १६ कोचेस अशी करण्यात आली आहे. कोचेस वाढ केलेल्या गाड्यामध्ये नांदेड- मनमाड गाडीचा समावेश आहे. या गाडीस ८ नोव्हेंबरपासून नांदेडहून कोचेस वाढ लागू करण्यात आली. तर ९ नोव्हेंबरपासून मनमाडहून ही वाढ लागू असेल. पूर्णा- आदिलाबाद गाडीस ९ नोव्हेंबरपासून वाढ लागू असेल. आदिलाबाद – परळी वैजनाथ व परळी वैजनाथ – अकोला गाडीस १० नोव्हेंबरपासून वाढ लागू असेल. अकोला – पूर्णा व पूर्णा – परळी वैजनाथ या दोन गाड्यास ११ नोव्हेंबरपासून कोचेस वाढ लागू असेल.
या निर्णयामुळे नांदेड विभागातील प्रवाशांना विशेषतः सामान्य वर्गात प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध होतील आणि त्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी बनण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचे प्रवाशांतून स्वागत होत आहे.