अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू; किनवटच्या आदिवासी पट्ट्यात 'दिवसा वीज' कधी मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:10 IST2026-02-18T12:08:46+5:302026-02-18T12:10:11+5:30
किनवटच्या आदिवासी बहुल भागात ताडोबाच्या धर्तीवर दिवसा वीज पुरवठा करा, आमदार भीमराव केराम यांची मागणी

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू; किनवटच्या आदिवासी पट्ट्यात 'दिवसा वीज' कधी मिळणार?
किनवट (जि. नांदेड) : आदिवासी बहुल डोंगराळ भाग असलेल्या किनवट तालुक्यात पैनगंगा अभयारण्य, तेलंगणातील कावल टायगर रिझर्व्ह आणि यवतमाळमधील टिपेश्वर अभयारण्य आहे. या त्रिकोणी वनक्षेत्रामुळे परिसरात वन्यप्राण्यांचा मोठा वावर असून, रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिवावर बेतत आहे. या पार्श्वभूमीवर, चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनप्रमाणेच या तालुक्यातही कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
तालुक्यातील दयाळ धानोरा येथील नऊ शेतकऱ्यांवर १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री हिंस्र अस्वलाने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सातजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण असून, शेतकरी रात्री शेतात जाण्यास धजावत नाहीत. अलीकडच्या काळात वन्य प्राणी मानव वस्तीकडे येऊ लागले असून, जंगलाच्या शेजारी शेत शिवार असल्याने रात्रीच्या वेळी पाणी देणे शेतकरी, सालगडी यांच्यासाठी जोखमीचे झाले आहे.
चंद्रपूर-गडचिरोलीच्या धर्तीवर सवलतीची अपेक्षा
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, मूल, सावली आणि गडचिरोली जिल्ह्यातील पोंभूर्णा या तालुक्यांत वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी कृषी पंपांना दिवसा वीज दिली जाते. याच धर्तीवर किनवटमधील भौगोलिक परिस्थिती आणि वाढता धोका लक्षात घेता, सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.
रात्रीची वीज देणे अन्यायकारक
किनवट तालुका तिन्ही बाजूंनी अभयारण्यांनी वेढलेला आहे. शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून रात्रीची वीज देणे अन्यायकारक आहे. मी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, किनवट तालुक्यात कृषी पंपांना चोवीस तास किंवा प्राधान्याने दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी लावून धरणार आहे.
- आमदार भीमराव केराम, किनवट, जि. नांदेड