नांदेडमध्ये मोठी घडामोड! काँग्रेस-वंचितचा हातात हात; दुसरीकडे युती, आघाडीचे घोडे अडलेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:40 IST2025-11-12T12:37:17+5:302025-11-12T12:40:54+5:30
काँग्रेस आणि वंचितने संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आघाडीची घोषणा केली आहे.

नांदेडमध्ये मोठी घडामोड! काँग्रेस-वंचितचा हातात हात; दुसरीकडे युती, आघाडीचे घोडे अडलेले
नांदेड: जिल्ह्यातील १२ नगर परिषद आणि एका नगर पंचायतीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी एकाही ठिकाणी उमेदवाराने आपले नामांकन दाखल केले नाही.
महायुती आणि महाविकास आघाडीचे घोडे अद्याप अडलेलेच असताना, मंगळवारी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने मात्र संयुक्त पत्रकार परिषद घेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आघाडीची घोषणा केली. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील इतर दोन घटक पक्ष काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात भोकर, नायगाव, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, लोहा, कंधार, किनवट, हदगाव, धर्माबाद, मुखेड, मुदखेड या १२ नगर परिषद तर हिमायतनगर या एकमेव नगर पंचायतची निवडणूक सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच सहा पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारांच्या मुलाखती आणि बैठकांचा सपाटा सुरू केला आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची काही दिवसांपूर्वीच बैठक झाली होती. परंतु अद्यापही त्यांचे एकत्र लढण्याबाबत एकमत झाले नाही. तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचितची बोलणी सुरू होती. मंगळवारी दोघांनीही संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आघाडीची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे महायुतीचे घोडेही अडलेलेच आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे शिंदेसेनेचे आमदार हेमंत पाटील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव चिखलीकर हे भाजपसोबत युतीचा प्रस्ताव देत असताना खासदार चव्हाण यांच्यावर मात्र सडकून टीका करीत आहेत. त्यांच्या या टीकेमुळे भाजपमधील मंडळी अस्वस्थ झाली आहेत. परिणामी तूर्त तरी, महायुतीचा तिढा सुटेल, असे दिसत नाही.