राधिका सुवर्णकारच्या बासरी वादनाने सारे मंत्रमुग्ध; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 06:18 PM2024-01-13T18:18:03+5:302024-01-13T18:18:43+5:30

चालुक्यकालीन मंदिरातील वर्गात बासरी वादनाची कला केली अवगत

All mesmerized by Radhika Suvarnakar's flute playing; Won first place in national competition | राधिका सुवर्णकारच्या बासरी वादनाने सारे मंत्रमुग्ध; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

राधिका सुवर्णकारच्या बासरी वादनाने सारे मंत्रमुग्ध; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

- शब्बीर शेख
देगलूर: 
 नवी दिल्ली येथे 9 ते 12 जानेवारी दरम्यान झालेल्या कला उत्सव या राष्ट्रीय स्पर्धेत देगलूर तालुक्यातील होट्टल या ग्रामीण भागातील राधिका नरसिंह सुवर्णकार या मुलीने बासरी वादन कला प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत यशाला गवसणी घातली. भारतातून प्रथम क्रमांक पटकावून राधिकाने देगलूरच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी या कला उत्सवाचे आयोजन करण्यात येते. 

या स्पर्धेत शास्त्रीय गायन,पारंपरिक लोकसंगीत, गायन, स्वर वाद्य वादन (बासरी) ताल वाद्य वादन,शास्त्रीय नृत्य, पारंपरिक लोक नृत्य, द्विमितीय चित्र, त्रिमितीय शिल्प, खेळणी तयार करणे, नाट्य असे एकूण दहा कला प्रकाराची स्पर्धा घेण्यात येते.यामध्ये विशेष करून मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात येऊन त्यामधून त्यांची निवड केली जाते.या स्पर्धेत राधिका सुवर्णकार हिने बासरी वादन या कला प्रकारातून आपला सहभाग नोंदविला होता. 8 नोव्हेंबर 2023 रोजी नांदेड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्यातील होट्टल येथील राधिका सुवर्णकार याने महिला गटातून प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यामुळे तिला राज्यस्तरावर नांदेडचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2023  रोजी पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही राधिकाने महिला गटातून राज्यातून प्रथम क्रमांक पटकावून यशात सातत्य ठेवले. दरम्यान, 9 ते 12 जानेवारी रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत राधिकाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. येथेही बासरी वादन या कला प्रकारात तिने भारतातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

चालुक्यकालीन मंदिरात भरणाऱ्या मोफत वर्गातील शिष्या
होट्टल येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या ऐनोदीन वारसी या ध्येयवेड्या शिक्षकाने बासरी वादन या कलेचा प्रसार होण्यासाठी मागील सहा वर्षापासून मोफत शास्त्रीय बासरी वादनाचे धडे देण्याचा संकल्प केला. शाळा संपल्यानंतर होट्टल येथील चालुक्यकालीन मंदिरात बासरी वादनाची शाळा नित्य नियमाने भरविली जाते. यामध्ये 25 ते 30 मुले,व मुली शास्त्रीय बासरी वादनाचे धडे घेण्यासाठी या ठिकाणी येतात. येथेचे शेतमजुराची मुलगी बारावीत शिकणाऱ्या राधिकाने बासरीचे वादनाची कला अवगत केली. याच बळावर उत्तुंग भरारी घेत यशाला गवसणी घातल्याने तिचे कौतुक होत आहे.

'होट्टल' ची यशाची परंपरा कायम राखली...
2022 मध्ये झालेल्या याच कला उत्सवामध्ये बासरी वादन या कला प्रकारात होट्टल येथील मुमताज हैदर पिंजारी या मुलीने महिला गटातून राज्यातून प्रथम क्रमांक मिळविला होता.तर देगलूर शहरातील अन्हद ऐनोद्दीन वारसी या मुलानेही बासरी वादन या कलाप्रकारात पुरुष गटातून राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यानंतर भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय कला उत्सवात आपला सहभाग नोंदविला होता. त्यांनंतर आता राधिका सुवर्णकारने दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत भारतातून प्रथम क्रमांक मिळवीत यशाची परंपरा कायम राखली आहे.

Web Title: All mesmerized by Radhika Suvarnakar's flute playing; Won first place in national competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.