कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 09:41 IST2025-10-26T08:20:36+5:302025-10-26T09:41:18+5:30
अजित पवार यांनी आठ लाख कोटी रुपयांच्या बजेटचा हिशोबच मांडला.

कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
नांदेड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका कार्यक्रमात भाषण सुरू असतानाच काही शेतकऱ्यांनी "दादा, कर्जमाफीबद्दल बोला," अशी मागणी केली. त्यावर पवारांनी आठ लाख कोटी रुपयांच्या बजेटमधून पगार, पेन्शन यांसह विविध योजनांवर किती पैसा खर्च होतो, असा हिशोबच मांडला. तसेच कर्जमाफीसाठी जरा सबुरीने घ्या, आम्ही त्यापासून बाजूला गेलो नाही, असा सल्लाही दिला.
उमरी तालुक्यातील गोरठा येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाषण सुरू असतानाच सभेला जमलेल्या काही शेतकऱ्यांनी "दादा, कर्जमाफीबद्दल बोला," अशी मागणी केली. त्यावर पवारांनी राज्याच्या तिजोरीचा जमा-खर्चच सादर केला. ते म्हणाले, यापूर्वी ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली. त्यानंतर झालेल्या कर्जमाफीसाठीही हजारो कोटी रुपये लागले. आता अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना ३१ हजार कोटी रुपये मदत देण्यात येत आहे. राज्याचे एकूण बजेट आठ लाख कोटींचे आहे. त्यात पगार आणि पेन्शनसाठी चार लाख कोटी रुपये लागतात. लाडक्या बहिणींना दरवर्षी ४५ हजार कोटी रुपये द्यावे लागतात. शेतकऱ्यांची वीज बिले माफ झाली. त्यापोटी महावितरणला २० ते २२ हजार कोटी, दिव्यांग, श्रावणबाळ यांसह इतर योजनांसाठी काही हजार कोटी, अंतुलेंच्या काळात महिन्याला ६० रुपये मिळणाऱ्या योजनेत आम्ही आता पंधराशे देतो. कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे. त्याच्या अहवालानंतर निर्णय होईल.