अघोरी ! भोंदूबाबाने दत्ताचा अवतार सांगत केला रक्ताभिषेक,अनेकांना लाखोंना गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 11:17 PM2021-10-13T23:17:25+5:302021-10-13T23:20:02+5:30

Black Magic in Nanded : दत्तप्रभूंचा अवतार म्हणून आलो असल्याचे तो भक्तांना सांगत होता. त्यासाठी मांडूळ, कासवाची पूजा करीत असे.

Aghori! Bhondubaba described the incarnation of Datta as Raktabhishek for black magic, ruining many millions | अघोरी ! भोंदूबाबाने दत्ताचा अवतार सांगत केला रक्ताभिषेक,अनेकांना लाखोंना गंडविले

अघोरी ! भोंदूबाबाने दत्ताचा अवतार सांगत केला रक्ताभिषेक,अनेकांना लाखोंना गंडविले

Next
ठळक मुद्दे राख खायला देणे, यज्ञात भाविकांचे रक्त टाकून रक्ताभिषेक करणे, असे अघोरी कृत्य तो करीत होता.

- शिवराज बिचेवार

नांदेड :  स्वत:ला दत्तप्रभूंचा अवतार असल्याचे सांगून गुप्तधन, कुटुंबाच्या भरभराटीसाठी केलेल्या यज्ञात भाविकांच्या रक्ताचा अभिषेक ( Bhondubaba practices black magic )  करणाऱ्या माहुरातील कपिले महाराज ऊर्फ विश्वजित कपिले या भोंदूबाबाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे ( crime against Bhondubaba ) . या बाबाने डोंबिवली आणि पुण्यासह अनेक उच्च शिक्षितांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात कारवाईसाठी पाठपुरावा केला होता.

मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील पूसदचा रहिवासी असलेला कपिले महाराज हा काही वर्षांपूर्वी माहुरात दत्त शिखरावर येत होता. त्यानंतर धार्मिक कार्यासाठी दत्तशिखराच्या वतीने मातृतीर्थ परिसरात बाबाला काही जागा देण्यात आली होती. या ठिकाणी बाबाने तीन वर्षांपूर्वी टीनशेड उभारले होती. याच ठिकाणी भोंदूबाबाचे अघोरी कृत्य सुरू होते. काही दिवसांतच बाबाच्या भक्तांमध्ये मोठी वाढ झाली.

दरवर्षी नवरात्रात बाबा या ठिकाणी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम घेत असे. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींसह नामांकित मंडळींची हजेरी राहत असे. गुप्तधन शोधून देणे, कुटुंबातील सदस्याला नोकरी लावणे, कौटुंबिक कलह दूर करणे, आजार बरे करणे यासाठीच दत्तप्रभूंचा अवतार म्हणून आलो असल्याचे तो भक्तांना सांगत होता. त्यासाठी मांडूळ, कासवाची पूजा करीत असे.
यज्ञ करून त्याची राख खायला देणे, यज्ञात भाविकांचे रक्त टाकून रक्ताभिषेक करणे, असे अघोरी कृत्य तो करीत होता. त्यासाठी भक्तांकडून बाबाने लाखो रुपये उकळले. डोंबिवली येथील सुरक्षा अभियंता प्रवीण शेरकर हे बाबाचे भक्त होते. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भोंदूबाबाने तब्बल २४ लाख रुपयांचा गंडा घातला, तर पुण्यातील एकाची अशाच प्रकारे फसवणूक केली. शेरकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्यांची भेट घेतली.

अंनिसने ही बाब अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या कानावर घातली. कबाडे यांनी तातडीने कारवाईच्या सूचना माहूर पोलिसांना दिल्या होत्या. त्यापूर्वी भोंदूबाबाची ही कृत्ये समजल्यानंतर दत्तशिखर संस्थानने त्यास हुसकावून लावले होते. बुधवारी या प्रकरणात रात्री उशिरा माहूर पोलीस ठाण्यात विश्वजित कपिले याच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, या भोंदूबाबाने शेकडो भाविकांना अशाच प्रकारे गंडविले असून, तक्रारींचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. भोंदूबाबाच्या शोधासाठी माहूर पोलिसांचे एक पथक सकाळीच पुसदला गेले होते; रात्री उशिरा भोंदू कपिले महाराज आणि त्याच्या भावाला माहूर ठाण्यात आणण्यात आले होते. गुरुवारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.

सेवानिवृत्त ‘डीवायएसपी’ने घालून दिली भोंदूबाबाची भेट
फसवणूक झालेले डोंबिवलीचे प्रवीण शेरकर यांची भोंदूबाबा कपिले महाराज याच्यासोबत एका सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षकानेच भेट घालून दिली होती.
nबाबाने आपल्या शक्तीने आजारी मुलीला बरे केल्याचे उपाधीक्षकाने शेरकर यांना सांगितले होते. त्यानंतर शेरकर हे नियमितपणे माहूरला येत असत. त्यांनी या भोंदूबाबाला चारचाकी वाहन, कॅमेरा आणि मोबाइलही घेऊन दिला होता.

भोंदूबाबाने अनेकांना गंडविले
विश्वजित कपिले हा भोंदूबाबा स्वत:ला दत्ताचा अवतार असल्याचे सांगत असे. त्याने अघेारी कृत्य करून अनेकांना गंडविले आहे. सध्या फक्त दोन तक्रारी आल्या आहेत. त्यात एकाची २४ लाखांची, तर दुसऱ्याची ७० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. प्रथमदर्शनी सध्या एकच आरोपी आहे; परंतु तपासात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे
-विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक

Web Title: Aghori! Bhondubaba described the incarnation of Datta as Raktabhishek for black magic, ruining many millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.