डॉक्टर दाम्पत्याचा कारनामा; पत्नीने मागितलेली लाखोंची लाच पती घेयचा, दोघांना पडल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 06:33 PM2024-03-11T18:33:44+5:302024-03-11T18:34:38+5:30

या प्रकरणात रात्री वजिराबाद पोलिस ठाण्यात डॉक्टर दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

After checking the blood bank, a bribe of Rs 50,000 was handed over to the doctor couple | डॉक्टर दाम्पत्याचा कारनामा; पत्नीने मागितलेली लाखोंची लाच पती घेयचा, दोघांना पडल्या बेड्या

डॉक्टर दाम्पत्याचा कारनामा; पत्नीने मागितलेली लाखोंची लाच पती घेयचा, दोघांना पडल्या बेड्या

नांदेड : शहरातील एका रक्तपेढीची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये त्रुटी न काढण्यासाठी डॉक्टर महिलेने १ लाख १० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती त्यातील ५० हजार रुपयांची लाच महिलेच्या डॉक्टर पतीला स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर करण्यात आली. या प्रकरणात डॉक्टर दाम्पत्याच्या विरोधात वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

डॉ. अश्विनी किशनराव गोरे या उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत. तसेच त्यांच्याकडे रक्त संक्रमण अधिकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार होता. तर त्यांचे पती डॉ. प्रीतम तुकाराम राऊत हे धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकार आहेत. डॉ. अश्विनी गोरे या ८ मार्च रोजी डॉक्टर लेन भागातील अर्पण रक्तपेढीची तपासणी करण्यासाठी आल्या होत्या. दुपारी एक वाजेच्या सुमारास गोरे यांनी रक्तपेढीची तपासणी केल्यानंतर साडेचार वाजेच्या सुमारास त्या तक्रारदाराला म्हणाल्या की, रक्तपेढी तपासणीत त्रुटी न काढण्यासाठी १ लाख १० हजार रुपये द्यावे लागतील, नाही तर तुमची रक्तपेढी कायमची बंद होईल. तक्रारदार यांनी सध्या पैसे नसल्याचे सांगितल्यावर आता जेवढे आहेत तेवढे द्या, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने दहा हजार रुपये काढून दिले. त्यानंतर डॉ. गोरे यांनी उर्वरित १ लाख रुपये घेण्यासाठी माणूस पाठविते, असे सांगितले. त्यानंतर डॉ. गोरे निघून गेल्या. 

याबाबत तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधून तक्रार केली. एसीबीने लाच मागणीची पडताळणी करण्यासाठी डॉ. गोरे यांना फोन केला. परंतु हा फोन त्यांनी उचलला नाही. थोड्याच वेळात अन्य एका क्रमांकावरून त्यांना फोन आला. समोरच्या व्यक्तीने डॉ. अश्विनी गोरे यांनी पाठविले असून मला भेटण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर या, असे सांगितले. तक्रारदार आणि एसीबीचे पथक लगेच पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर पोहचले. या ठिकाणी डॉ. अश्विनी गोरे यांचे पती डॉ. प्रीतम गोरे हे थांबलेले होते. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून डॉ. प्रीतम गोरे याला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात रात्री वजिराबाद पोलिस ठाण्यात डॉक्टर दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. गजानन बोडके, राजेश राठोड, स. खदीर, बालाजी मेकाले, अरशद खान, प्रकाश मामुलवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आणले का? किती आणले? त्यांना द्या
तक्रारदार हे डॉ. अश्विनी गोरे यांनी पाठविलेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर गेले. या ठिकाणी व्यक्तीची भेट झाल्यानंतर खात्री करण्यासाठी तक्रारदाराने डॉ. गोरे यांना फोन लावला. त्यावर गोरे यांनी आणले का? किती आणले? त्यांना द्या, असे म्हणाल्या. त्यावर तक्रारदाराने ५० हजार रुपये आणल्याचे सांगितल्यावर गोरे यांनी तुम्ही दिलेला शब्द पाळा, ठरल्याप्रमाणे द्या, असे म्हणाल्या. त्यावर तक्रारदाराने पैसे जमवाजमव करायला वेळ लागेल असे म्हणताच डॉ.गोरे यांनी ठिक आहे, असे म्हणत फोन कट केला.

Web Title: After checking the blood bank, a bribe of Rs 50,000 was handed over to the doctor couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.