मंत्री नरहरी झिरवळांच्या साधेपणाची झलक; ताफा थांबवून छोट्याशा दुकानात केली दाढी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:05 IST2025-06-02T13:05:01+5:302025-06-02T13:05:44+5:30

मंत्री नरहरी झिरवळांनी साधेपणाने जिंकले मनं; रस्त्याच्या कडेच्या कटिंगच्या छोट्याशा दुकानात थांबून केली दाढी

A glimpse of Minister Narahari Zirwal's simplicity; He stopped his convoy and shaved in a small shop! | मंत्री नरहरी झिरवळांच्या साधेपणाची झलक; ताफा थांबवून छोट्याशा दुकानात केली दाढी!

मंत्री नरहरी झिरवळांच्या साधेपणाची झलक; ताफा थांबवून छोट्याशा दुकानात केली दाढी!

नांदेड : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज, सोमवारी ( दि. २ ) आपल्या साधेपणाचा वेगळाच परिचय नांदेड जिल्ह्यात दिला. किनवट तालुक्यातील शेतकरी मेळावा आणि एका विवाह समारंभासाठी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या झिरवळ यांनी, प्रवासादरम्यान अचानक आपला ताफा थांबवला. कारणही तितकेच खास होते. मंत्री महोदयांनी रस्त्याच्या कडेच्या एका साध्या कटींगच्या दुकानात जात दाढी केली. झिरवळ यांचे साधे राहणीमान, ग्रामीण संवाद शैली याची पुन्हा एकदा प्रचिती आली. 

इस्लापूर गावात एका छोट्याशा कटिंगच्या दुकानासमोर ते थांबले आणि कोणताही आडपडदा न ठेवता, थेट दुकानात जाऊन दाढी केली. त्यांच्या सोबत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह स्थानिक लोकही काही क्षणांसाठी आश्चर्यचकित झाले. मात्र, झिरवळ यांनी अत्यंत सामान्य आणि साध्या पद्धतीने, कटिंगच्या दुकानातील स्थानिक न्हाव्याशी संवाद साधत दाढी करून घेतली.

मंत्री गावातील एका दुकानात दाढी करण्यासाठी थांबले असल्याची वार्ता समजताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. अनेकांनी मंत्री झिरवळांचे फोटो व व्हिडीओ मोबाईलमध्ये टिपले. इस्लापूरमधील जनतेने त्यांचे साधेपण व सहज वागणे याचे कौतुक केले. मंत्री झिरवळ हे आपल्या साध्या व सामान्य जीवनशैलीसाठी ओळखले जातात. मोठ्या थाटामाटात न राहता, सामान्य जनतेसारखे वागणे आणि संवाद साधणे, हीच त्यांची ओळख आहे, आणि आज इस्लापूरमध्ये पुन्हा एकदा याची प्रचिती आली.

Web Title: A glimpse of Minister Narahari Zirwal's simplicity; He stopped his convoy and shaved in a small shop!