नांदेड जिल्ह्यातील ४५२ गावांना गारपिटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:26 IST2018-02-15T00:26:44+5:302018-02-15T00:26:58+5:30

जिल्ह्यातील ४५२ गावांना ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तब्बल २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रांतील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. चार ते पाच दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त होणार आहे.

 452 villages in Nanded district hit the hailstorm | नांदेड जिल्ह्यातील ४५२ गावांना गारपिटीचा फटका

नांदेड जिल्ह्यातील ४५२ गावांना गारपिटीचा फटका

ठळक मुद्दे२९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र बाधित : नुकसानीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील ४५२ गावांना ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तब्बल २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रांतील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. चार ते पाच दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त होणार आहे.
जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान १० तालुक्यांत गारपीट झाली. वादळीवा-यासह अवकाळी पाऊसही झाला. या पावसाने एक जण जखमी झाला आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका हदगाव तालुक्याला बसला असून तालुक्यात ७ हजार ७४३ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली. यामध्ये जिरायत क्षेत्र ७ हजार ४६९ हेक्टर, बागायत २५० आणि २४ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल किनवट तालुक्यात २ हजार ९४५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. नांदेड तालुक्यात २ हजार ७३९ क्षेत्रातील जिरायत, बागायत व फळपिके बाधित झाली आहेत.
धर्माबाद तालुक्यात २ हजार ४०५ हेक्टर क्षेत्रातील पिके गारपिटीने बाधित झाली. बिलोली तालुक्यात २ हजार १९६, नायगाव तालुक्यात १ हजार ८९९, लोहा तालुक्यात १ हजार ६९२, माहूर तालुक्यात २ हजार २२३ हेक्टर, हिमायतनगर तालुक्यात १ हजार १३१ हेक्टर आणि कंधार तालुक्यात १६५ हेक्टर क्षेत्रात शेतीचे नुकसान झाले आहे.
नांदेड तालुक्यात १८, धर्माबाद तालुक्यात ५६, नायगाव तालुक्यातील २३, बिलोली तालुक्यातील १२, कंधार तालुक्यातील ३४, हदगाव तालुक्यातील ४४, हिमायतनगर तालुक्यातील ४, किनवट तालुक्यातील ९५ आणि माहूर तालुक्यातील १६६ गावांना गारपिटीचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात गारपीट आणि विजा पडून १३ मोठी जनावरे आणि ९ लहान जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यात २४ हजार ९३५ हेक्टर क्षेत्रातील जिरायत पिकांना गारपिटीचा फटका बसला आहे. तर ४ हजार १७७ बागायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर ५२३ हेक्टर क्षेत्रातील फळपिके जमीनदोस्त झाले आहेत.
जिल्ह्यात गत तीन दिवसांत १८ मि़मी़पावसाची नोंद करण्यात आली आहे़ त्यात नांदेड- ५.७५ मिमी., अर्धापूर- १३.६७, मुदखेड- ७.३४, भोकर- ११.७५ मिमी., उमरी-८.००, धर्माबाद- २३.३३, नायगाव- २०.६, बिलोली- १०.८, लोहा- १५.५, कंधार- ६.८३, मुखेड- २१.२८ मिमी., देगलूर- ९.८३, हदगाव १०.०१ मिमी., हिमायतनगर- २.००, किनवट- १८.७१ तर माहूर तालुक्यात १८.०० मिमी. पावसाची नोंद झाली आहे़
आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील -जिल्हाधिकारी
गारपिटीमुळे अर्धापूर, मुदखेड, भोकर, उमरी, मुखेड आणि देगलूर तालुक्यांत कोणतेही नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून केले जात आहेत. हे पंचनामे आठवडाभरात पूर्ण होतील. त्यानंतरच नुकसानीचा अंतिम आकडा हाती येईल, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.
४जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत मंगळवारी केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास २३ हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता़ मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढला आहे़

Web Title:  452 villages in Nanded district hit the hailstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.