१३ दिवसांची झुंज अपयशी, सरकारी नोकरीच्या महिनाभरातच घरातील कर्त्याचा अपघाती मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:21 IST2025-11-27T12:19:38+5:302025-11-27T12:21:04+5:30
मेहनतीने मिळवलेली सरकारी नोकरी, पण तरुणाला महिनाभरातच काळाने गाठले

१३ दिवसांची झुंज अपयशी, सरकारी नोकरीच्या महिनाभरातच घरातील कर्त्याचा अपघाती मृत्यू!
- गोविंद टेकाळे
अर्धापूर: मेहनतीने मिळवलेली सरकारी नोकरी करण्याची इच्छा अपूर्ण राहिली, आणि चार बहिणींचा एकुलता एक आधार नियतीने हिरावून घेतला. अर्धापूर येथील वैभव गणेश राऊत (वय ३०) यांचा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर १३ दिवसांच्या मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष अखेर अपयशी ठरला आहे. नोकरीला लागून महिना होत नाही तोच वैभव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने अर्धापूर शहर आणि राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मेहनतीने मिळवली होती नोकरी
वैभव राऊत हे अतिशय हुशार आणि मितभाषी होते. त्यांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयकर सहाय्यक म्हणून मोठी नोकरी मिळवली होती. गत एक महिन्यापासूनच ते तेथे रुजू झाले होते आणि कुटुंबासाठी त्यांचा आधार भक्कम होणार होता.
नियतीचा क्रूर खेळ, १३ दिवसांची मृत्यूशी झुंज
दि. १३ नोव्हेंबर रोजी वैभव राऊत हे नांदेड येथील नोकरीवरून अर्धापूर शहरातील घराकडे दुचाकीने परत येत होते. शहरातच त्यांच्या दुचाकीला अपघात झाला आणि ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या १३ दिवसांपासून त्यांचे जीवन आणि मृत्यू यांच्यात शर्थीची झुंज सुरू होती. कुटुंबाच्या आणि मित्रांच्या प्रार्थना अपूर्ण ठरवत बुधवारी (दि. २६) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
चार बहिणींचा आधार हरपला
गणेशराव राऊत यांना चार मुलींनंतर झालेला एकुलता एक मुलगा म्हणजे वैभव. तोच कुटुंबाचा आधार आणि ‘कर्ता पुरुष’ होता. हुशार आणि मितभाषी वैभवच्या अपघाती निधनाने घराला मोठा आधार देणारे छत्रच हरपले आहे. वैभव यांच्या पश्चात आई-वडील आणि चार बहिणी असा मोठा परिवार आहे. ज्या घरात उत्साहाचे वातावरण होते, त्या घरात आज एक महिन्यापूर्वी मिळालेल्या सरकारी नोकरीच्या आनंदाऐवजी शोकाकूल शांतता पसरली आहे. बुधवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.