कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णसंख्येचा असलेला वेग दुसऱ्या लाटेत मात्र झपाट्याने वाढला. प्रतिदिन १७०० रुग्ण आढळत होते. पहिल्या लाटेत प्रतिदिन रुग्ण आढळण्याची सर्वोच्च संख्या ही ४४० इतकी होती.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा एकूण आकडा ८४ हजार ४१४ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सध्या रुग्णसंख्या स्थिर आहे. दुसऱ्या लाटेत प्रतिदिन ९७ वर आलेली रुग्णसंख्या पुन्हा २०० पार पोहोचली आहे. चाचण्या कमी रुग्ण कमी, चाचण्या जास्त रुग्ण वाढ अशी परिस्थिती जिल्ह्यात असताना आता पुन्हा एकदा गृहविलगीकरणातील उपचार बंद करण्यात येतील असे राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना केअर सेंटरवर पुन्हा भार पडणार आहे.
महापालिकाअंतर्गत सध्या एनआरआय भवन आणि महसूल भवन येथे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता कमी होत आहे. त्यामुळे कोरोना केअर सेंटर रिकामे आहेत. पण रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा प्रश्न निर्माण होणार आहेत.
राज्यशासनाने यापूर्वीही गृहविलगीकरणात रुग्ण ठेवण्यात येऊ नये असे निर्देश दिले होते. ते आदेश लगेच मागे घेतले होते. आता पुन्हा एकदा गृहविलगीकरण बंद करण्याचे आदेश दिले आहेत.