जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:52 IST2020-07-16T00:51:08+5:302020-07-16T00:52:37+5:30

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार ऊर्फ बबलू बर्वे हेसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

Zilla Parishad president's husband Corona Positive | जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती कोरोना पॉझिटिव्ह

जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती कोरोना पॉझिटिव्ह

ठळक मुद्देअधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये भरली धडकी : जिल्हा परिषदेतही कोरोनाचा शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार ऊर्फ बबलू बर्वे हेसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी ते जि.प.मध्ये आले होते. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. या सर्वांच्या बुधवारी तपासण्यासुद्धा झाल्या आहेत.
यापूर्वी शिक्षण विभागातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर जवळपास ५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. यात सर्वच निगेटिव्ह निघाले. आता जि.प. अध्यक्षांच्या पतीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. अध्यक्षांचे पती जिल्हा परिषद कार्यालयात आणि अध्यक्षांच्या बंगल्यावर असतात. अनेक बैठकांच्या वेळी ते उपस्थित राहत असल्याची चर्चा आहे. अध्यक्षांच्या कार्यालयात सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांची वर्दळ राहते. त्यामुळे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत अध्यक्ष व त्यांच्या कुटुंबीयांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजते.

कामठी-कन्हान कोरोनाचे हॉटस्पॉट
जि.प. अध्यक्ष यांचे सर्कल कन्हानमध्ये आहे. त्यांचे राहणेसुद्धा कन्हान परिसरातच आहे. कामठी आणि कन्हान सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून येथून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. अध्यक्षांच्या पतीला शनिवारी ताप आला. त्यांनी कोरोनाची तपासणी केली असता, ते पॉझिटिव्ह निघाले. मंगळवारी अध्यक्षांनीही कामठीमध्ये आढावा सभा घेतल्याची माहिती आहे.

पदाधिकाऱ्यांची रॅपिड अ‍ॅण्टिजेन टेस्ट, अधिकारी कर्मचाऱ्यांचेही घेतले स्वॅबिंग
अध्यक्षांचे पती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांची रॅपिड अ‍ॅण्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात पदाधिकारी निगेटिव्ह निघाल्याची माहिती आहे. तर हायरिस्कमध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन मेडिकलला पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल गुरुवारी येणार आहे.

Web Title: Zilla Parishad president's husband Corona Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.