Youth arrested for stealing Rs 7 lakh | सात लाख रुपये चोरी करणाऱ्या तरुणास अटक

सात लाख रुपये चोरी करणाऱ्या तरुणास अटक

ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसांची कामगिरी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : एका कंपनीतील व्यवस्थापकाच्या आलमारीतून ७ लाख रुपये चोरून रेल्वेने जात असलेल्या तरुणास लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. त्याच्या जवळून ५ लाख ९० हजार ८२० रुपये आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेला मोबाईल जप्त करण्यात आला.
दिनेशकुमार गुलाबराम चौधरी (२०) रा. कटघोरी, कोरबा, छत्तीसगड असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. तो हैदराबाद येथील गोविंद अग्रवाल यांच्या आनंद फूड्स कंपनीत बिस्कीट बनविण्याचे काम करीत होता. त्याच कंपनीत त्याचा भाऊ कामाला आहे. कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा असल्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापकाने ७ लाख रुपये ड्रॉवरमध्ये ठेवले होते. संधी मिळताच आरोपी दिनेशकुमारने सात लाख रुपये चोरून पळ काढला. या घटनेची तक्रार साहिदाबाद, आंध्र प्रदेश येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली. आरोपी हैदराबादहून वारंगल आणि वारंगलहून वर्धेला आला. वर्धेवरून तो पुढे गावाकडे जात असताना लोहमार्ग पोलिसांनी त्याला गजाआड केले. लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी पथक तयार केले. त्यात सहायक पोलीस निरीक्षक चौधरी, हवालदार दीपक डोर्लीकर, रवींद्र सावजी, विनोद खोब्रागडे यांचा समावेश करण्यात आला. पथकाने रेल्वेगाड्यांची तपासणी केली. वर्धा रेल्वेस्थानकावर त्यांना आरोपी आढळला. आरोपीला साहिदाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title: Youth arrested for stealing Rs 7 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.