इन्स्टाग्राम फ्रेंडकडून अगोदर अत्याचार, मग जीवे मारण्याची धमकी
By योगेश पांडे | Updated: August 23, 2023 17:21 IST2023-08-23T17:18:53+5:302023-08-23T17:21:06+5:30
पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार

इन्स्टाग्राम फ्रेंडकडून अगोदर अत्याचार, मग जीवे मारण्याची धमकी
नागपूर : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळखी झालेल्या एका आरोपीने तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिने लग्नाची विचारणा केली असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
साहील उमेश भलावी (२१, बुटीबोरी) असे आरोपीचे नाव आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात त्याची एका २३ वर्षीय तरुणीशी इन्स्टाग्रामवर ओळखी झाली होती. त्याने तिला अगोदर मैत्री करू असे म्हटले. त्यानंतर तिचा मोबाईल क्रमांक घेत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला लग्न करू असे म्हणत तिच्या घरी जाऊन शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर तो तिला जबरदस्ती बुटीबोरीतील हॉटेलमध्ये घेऊन गेला व तेथेदेखील अत्याचार केला. तिने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. २८ जुलै रोजी तिने त्याला परत विचारले असता त्याने लग्न करण्यास नकार दिला व तिला मारण्याची धमकी दिली. अखेर तरुणीने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी साहीलविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.