युवा शिवकथाकार डॉ. सुमंत टेकाडे यांचे कोरोनामुळे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 13:07 IST2021-04-17T13:07:28+5:302021-04-17T13:07:49+5:30
Dr. Sumant Tekade Dies Due To Corona : वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानामुळे ते युवा वर्गात अतिशय लोकप्रिय होते.

युवा शिवकथाकार डॉ. सुमंत टेकाडे यांचे कोरोनामुळे निधन
नागपूर - छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य याचा वस्तुपाठ नव्या पिढीपुढे सादर करणारे प्रख्यात युवा शिवकथाकार डॉ. सुमंत दत्ता टेकाडे (३८) यांचे कोरोना संक्रमनामुळे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानामुळे ते युवा वर्गात अतिशय लोकप्रिय होते.
बंगळुरू येथून व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सुमंत विप्रोच्या मानव संसाधन विभागात कार्यरत होते. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघा विषयीचे प्रेम स्वस्थ बसु देत नसल्याने नोकरी सोडून ते प्रचारक गेले व नंतर व्यवस्थापन विषयात आचार्य पदवी संपादंन करुन ते एस.पी. जैन महाविद्यालयात काही काळ विभागप्रमुख होते. तिही नोकरी सोडून त्यानी शिवराय व त्यांचे व्यवस्थापन कौशल्य व व्यवस्थापनाशी निगडीत इतर विषय यावर भाषणे देऊन समाजप्रबोधन करण्याचे व्रत अंगीकारले. त्यांचे राज्य आणि परराज्यातिल कार्यक्रम लक्ष वेधून घेत होते. त्यांचे आजोबा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाष्यकार मा.गो. वैद्य आणि शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
लवकरच त्यानी लिहीलेल्या पुस्तकाचे व लेखसंग्रहाचे प्रकाशन करण्याचा त्यांचा मानस होता. त्यातच काळाने घाव घातला व एका समाजभीमूख व्यक्तिमत्वाचा अंत झाला. ते नवयुग विद्यालयाचे माजी शिक्षक वा धरमपेठ शिक्षण संस्थेचे माजी पदाधिकारी दत्ता टेकाडे यांचे पुत्र होते. त्यांच्या मागे पत्नी माधवी, दोन मुले आणि आई व बराच मोठा आप्तपरीवार आहे.