दारूच्या वादातून गळा चिरून तरुणाची हत्या; काटाेल शहरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 13:50 IST2023-02-08T13:48:46+5:302023-02-08T13:50:11+5:30
आराेपीचा शाेध सुरू

दारूच्या वादातून गळा चिरून तरुणाची हत्या; काटाेल शहरातील घटना
काटाेल (नागपूर) : केवळ ताेंडओळख असलेल्या दाेघांमध्ये दारू पिताना भांडणाला सुरुवात झाली. त्यातच एकाने दुसऱ्याचा चाकूने गळा चिरून खून केला आणि घटनास्थळाहून पळून गेला. ही घटना काटाेल शहरात मंगळवारी (दि. ७) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
आकाश अशोक सावरकर (२८, रा.शनिचौक, काटोल) असे मृताचे, तर शैलेश लाड, रा.खंते लेआउट, काटोल असे फरार आराेपीचे नाव आहे. दाेघांचीही आपसात ताेंडओळख हाेती. ते मंगळवारी दुपारी काटाेल शहरातील फल्ली मार्केट परिसरात दारू पिण्यासाठी गेले हाेते. दारू पिण्यावरून त्या दाेघांमध्ये वाद उद्भवला व भांडणाला सुरुवात झाली.
त्यातच काही कळण्याच्या आत शैलेशने चाकू काढून आकाशच्या गळ्यावर दाबला. यात त्याचा गळा चिरल्याने ताे गंभीर जखमी झाला. ताे खाली काेसळताच शैलेशने घटनास्थळाहून पळ काढला. माहिती मिळताच, पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला जखमी आवस्थेत शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला नागपूरला हलविण्यात आले. मात्र, त्याचा वाटेत मृत्यू झाला. या प्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी शैलेशचा शाेध सुरू केला आहे.