वेळीच औषधोपचार न मिळाल्याने नागपुरात तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 18:48 IST2020-05-05T18:46:18+5:302020-05-05T18:48:28+5:30
तीव्र आर्थिक कोंडीमुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका तरुणाची प्रकृती सारखी बिघडतच गेली आणि त्याचा करुण अंत झाला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली.

वेळीच औषधोपचार न मिळाल्याने नागपुरात तरुणाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीव्र आर्थिक कोंडीमुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका तरुणाची प्रकृती सारखी बिघडतच गेली आणि त्याचा करुण अंत झाला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली. साहिल सुनील मोहबे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एनआयटी क्वॉर्टरमध्ये राहणारा साहिल गेल्या १० वर्षांपासून मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होता. साहिलचे वडील वृद्ध असून, ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अर्जनवीस म्हणून काम करतात. त्यांची आर्थिक स्थिती फारच खराब आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, साहिलला वयाच्या बाराव्या वर्षापासून मधुमेहाने ग्रासले होते. तो सकाळ-संध्याकाळ इन्सुलिन घेत होता. काही दिवसापूर्वी त्याचे मूत्रपिंड खराब झाले. डॉक्टरांनी महागडे आणि तातडीचे औषधोपचार सांगितले. परंतु घरात खायची सोय नसल्याने सर्वच हवालदिल होते. त्यामुळे उपचारात हयगय झाली. १५ दिवसापूर्वी साहिलला लघवी येणे बंद झाले. घराजवळच्या
डॉक्टरकडून जुजबी उपचार घेऊन साहिल आणि कुटुंबीय दिवस ढकलत होते. त्यामुळे प्रकृती बिघडत गेली. त्याला चार दिवसापासून ताप आला होता. मात्र घरीच त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याची अवस्था लक्षात घेऊन शेजाऱ्यांनी त्याला दवाखान्यात नेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र लॉकडाऊनमुळे तीव्र आर्थिक कोंडी असल्याने त्याच्या घरच्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कपिलनगर पोलिसांना सोमवारी दुपारी एका व्यक्तीने फोन करून काही तरी संशयास्पद असल्याची माहिती दिली. पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वैद्यकीय पथक घेऊन साहिलचे घर गाठले. त्याला मेयोत नेण्यात आले. मात्र काही वेळातच डॉक्टरांनी साहिलला मृत घोषित केले. तीव्र आर्थिक कोंडीमुळे आवश्यक उपचार वेळेवर न मिळाल्याने साहिलचा जीव गेल्याची माहिती परिसरात चर्चेला आली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. याप्रकरणी सोमवारी कपिलनगरचे एएसआय राजीव डोंगरे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.