महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:38 IST2025-09-23T18:36:31+5:302025-09-23T18:38:42+5:30
Nagpur : या उपक्रमातून गोळा केलेली उत्कृष्ट छायाचित्रे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध प्रचार मोहिमांमध्ये वापरली जाणार

You can win 5 lakhs by taking photos of tourist places in Maharashtra! Where to upload, what is the scheme?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रचार व प्रसिद्धीसाठी व निसर्गरम्य, ऐतिहासिक पर्यटनस्थळांना जगासमोर आणण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. 'तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे' या नावाने सुरू झालेल्या या स्पर्धेत पर्यटकांनी टिपलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या पहिल्या क्रमांकाच्या छायाचित्रकाराला तब्बल ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.
पर्यटनस्थळांचा प्रचार, प्रसिद्धी
या उपक्रमातून गोळा केलेली उत्कृष्ट छायाचित्रे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध प्रचार मोहिमांमध्ये वापरली जाणार आहेत. यात पर्यटन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर, सोशल मीडियावर, जाहिरातींमध्ये आणि पर्यटन प्रदर्शनांमध्ये या फोटोंचा वापर केला जाईल. यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची ओळख जागतिक स्तरावर अधिक प्रभावीपणे होईल.
अशी होईल फोटोंची निवड
प्राप्त झालेल्या सर्व फोटोंची तपासणी आणि निवड करण्यासाठी पर्यटन आणि छायाचित्रण क्षेत्रातील तज्ज्ञांचे एक विशेष मंडळ नेमण्यात आले आहे. हे मंडळ फोटोंची गुणवत्ता, विषयाची निवड, छायाचित्रणाची कलात्मकता आणि कथेची मांडणी या निकषांवर निवड करेल. फोटो ऑफ दि डे, फोटो ऑफ दी मंथ ची निवड समाजमाध्यमावरून मतदानावर आधारित निकषानुसार करण्यात येणार आहे.
फोटोसाठी निकष आणि शर्ती
तुम्हाला महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचे सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धी दर्शवणारे छायाचित्र (फोटो) जमा करावे लागतील, कारण हा उपक्रम महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी आयोजित केला आहे. निवड समितीचा निर्णय अंतिम असेल. तुम्ही फिरलेल्या स्थळाचे फोटो एमटीडीसीच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत. फोटो ऑफ दि डे, फोटो ऑफ दी मंथ ची निवड समाजमाध्यमावरून मतदानावर आधारित निकषानुसार करण्यात येणार आहे.
काय आहे योजना?
महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांचे सौंदर्य, संस्कृती आणि समृद्ध वारसा छायाचित्रांच्या माध्यमातून मांडणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सामान्य नागरिक आणि पर्यटकांनी काढलेले फोटो अधिक प्रामाणिक आणि नैसर्गिक असतात, ज्यामुळे राज्याच्या पर्यटनाचा खरा अनुभव जगासमोर येतो. ही स्पर्धा केवळ व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी नसून, हौशी फोटोग्राफर्सनाही यामध्ये सहभागी होता येईल.
प्रथम विजेत्यास पाच लाख, इतरांनाही बक्षिसे
नामवंत पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीकडून छायाचित्र निवडण्यात येतील. प्रथम विजेत्यांस ५ लाख रुपये, प्रथम उपविजेता १ लाख रुपये, द्वितीय उपविजेता ७५ हजार, पाच उत्स्फूर्त पारितोषिके प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे देण्यात येतील.
विविध श्रेणींत फोटोंची निवड
या उपक्रमात प्रवाशांनी घेतलेली निवडक छायाचित्रे, फोटो ऑफ दि डे, फोटो ऑफ दी मन्थ, फोटो ऑफ दी इअर या श्रेणीमध्ये विभागणी करून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील. डिजिटल फोटो गॅलरीमध्ये निवडक छायाचित्रकारांची माहिती प्रदर्शित केली जाईल. फोटो ऑफ दि इअर या श्रेणींसाठी नामवंत पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीकडून छायाचित्र निवडण्यात येतील.
फोटो ऑफ द मंथसाठी रिसॉर्टमध्ये स्टे
फोटो ऑफ दि मंथ विजेत्यांना दोन जणांसाठी तीन दिवस, दोन रात्रीचे एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये विनामूल्य राहता येईल.
"हा अतिशय चांगला उपक्रम आहे. पर्यटकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि भेट दिलेल्या पर्यटनस्थळांचे छायाचित्र एमटीडीसीच्या संकेतस्थळावर अपलोड करावे आणि बक्षिसे जिंकावे."
- दिनेश कांबळे, वरिष्ठ प्रबंधक, एमटीडीसी