‘यस्स… वी आर द बेस्ट!’; नागपुरात टीम इंडियाच्या ‘वर्ल्ड कप’ विजयाचे जंगी सेलिब्रेशन

By योगेश पांडे | Updated: March 8, 2026 23:33 IST2026-03-08T23:33:05+5:302026-03-08T23:33:52+5:30

Nagpur News: भारताने सलग दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकत क्रिकेटविश्वात आपले वर्चस्व कायम ठेवले आणि नागपूरकर आनंदाने अक्षरशः रस्त्यावर उतरून सेलिब्रेशन केले. सामना संपताच शहरातील रस्ते, चौक आणि मैदानांवर चाहत्यांचा जल्लोष उसळला.

‘Yesss… We are the best!’; Vigorous celebration of Team India’s ‘World Cup’ victory in Nagpur | ‘यस्स… वी आर द बेस्ट!’; नागपुरात टीम इंडियाच्या ‘वर्ल्ड कप’ विजयाचे जंगी सेलिब्रेशन

‘यस्स… वी आर द बेस्ट!’; नागपुरात टीम इंडियाच्या ‘वर्ल्ड कप’ विजयाचे जंगी सेलिब्रेशन

- योगेश पांडे
नागपूर  - भारताने सलग दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकत क्रिकेटविश्वात आपले वर्चस्व कायम ठेवले आणि नागपूरकर आनंदाने अक्षरशः रस्त्यावर उतरून सेलिब्रेशन केले. सामना संपताच शहरातील रस्ते, चौक आणि मैदानांवर चाहत्यांचा जल्लोष उसळला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, देशभक्तीच्या घोषणा आणि नाचगाण्यांनी संपूर्ण शहरात दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले.

रविवारचा दिवस आणि त्यात भारत-न्यूझीलंडचा टी-ट्वेंटी विश्वचषकातील ‘हाय व्होल्टेज’ अंतिम सामना असल्याने सकाळपासूनच क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अनेकांनी कामे बाजूला ठेवून टीव्हीसमोर तळ ठोकला होता. काही भागांत मोठ्या स्क्रीनवर सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सामना सुरू होण्यापूर्वी काही मंदिरांमध्ये चाहत्यांनी टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थनाही केली.

पहिल्या इनिंगमध्ये भारताने दमदार बॅटिंग करत अडीचशेचा आकडा गाठल्यानंतरच चाहत्यांमध्ये आनंदाला उधाण आले होते. सामन्याचा शेवट भारताच्या विजयाने होताच शहरात आनंदाचा स्फोट झाला. अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर तिलक वर्माने सीमारेषेजवळ झेल घेतला अन दिवसभर शांत असलेले रस्ते क्षणार्धात लोकांनी भरून गेले. धरमपेठ, सदर, वर्धमाननगर, महाल, फुटाळा, इतवारी या भागांत तरुणांचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता. ‘कमॉन इंडिया’, ‘भारत माता की जय’, ‘चक दे इंडिया’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात तरुणांनी नाचत आनंद व्यक्त केला. महाल-इतवारी परिसरात फटाक्यांची जबरदस्त आतषबाजी करण्यात आली. काही चौकांमध्ये चाहत्यांनी एकमेकांना मिठाई, लाडू वाटून विजयाचा आनंद साजरा केला. अनेकांनी तिरंगा हातात घेत रॅली काढत आनंदोत्सव साजरा केला.

लक्ष्मीभुवन चौकात तरुणाई थिरकली
रविवारची सुटी आणि त्यात मिळालेला ऐतिहासिक विजय यामुळे आनंदाला आणखी उधाण आले. धरमपेठेतील लक्ष्मीभुवन चौक येथे तरुणांची मोठी गर्दी उसळली होती. येथे तरुणांसोबतच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकदेखील नाचत-गात सेलिब्रेशन करताना दिसून आले. अनेक कुटुंबेही घराबाहेर पडून या उत्सवाचा भाग बनली. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचादेखील कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

रेस्टॉरेन्ट, ढाबे हाऊसफुल
शहरातील अनेक रेस्टॉरंट्स, कॅफे आणि चौकांमध्ये रात्री उशिरापर्यंत चाहत्यांची गर्दी कायम होती. अनेकांनी केवळ ‘फायनल’साठी शहराबाहेरील रिसॉर्ट आणि फार्महाऊस बुक केले होते. सायंकाळपासूनच तेथे गर्दी दिसून आली. सामना संपल्यावरदेखील तेथे मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन झाले.

सोशल माध्यमांवर फक्त ‘शर्मा-सॅमसन-बुमराह’चा जलवा
सोशल मीडियावरही भारताच्या विजयाचा जल्लोष दिसून आला. फेसबुक, एक्स (ट्विटर) आणि व्हॉट्सॲपवर अभिनंदनाच्या संदेशांचा अक्षरशः पाऊस पडत होता. मीम्स, व्हिडीओ आणि क्रिएटिव्ह पोस्टद्वारे चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला. विशेषत: सलामीवर अभिषेक शर्मा, संजू सॅमसन व जसप्रीत बुमराह हे तर या ई-सेलिब्रेशनचे ‘शोस्टॉपर’ ठरले.

Web Title : नागपुर में टीम इंडिया की टी20 विश्व कप जीत का शानदार जश्न!

Web Summary : भारत के टी20 विश्व कप जीतने पर नागपुर खुशी से झूम उठा। सड़कों पर जश्न, आतिशबाजी और नृत्य हुआ। युवाओं ने मिठाई बांटकर और तिरंगा लहराकर खुशी मनाई। रेस्टोरेंट और कैफे उत्साह से गुलजार थे, जबकि सोशल मीडिया पर शर्मा, सैमसन और बुमराह छाए रहे।

Web Title : Nagpur Celebrates India's T20 World Cup Victory in Style!

Web Summary : Nagpur erupted in joy as India clinched the T20 World Cup. Streets filled with celebrations, fireworks, and dancing. Youngsters rejoiced, distributing sweets and waving the tricolor. Restaurants and cafes buzzed with excitement, while social media celebrated Sharma, Samson, and Bumrah.