याकूबचा ‘डेथ वॉरंट’ नागपुरात पोहचला

By Admin | Updated: July 16, 2015 03:04 IST2015-07-16T03:04:12+5:302015-07-16T03:04:12+5:30

मुंबई येथे १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्ब स्फोट मालिकेतील मुख्य आरोपी याकूब अब्दुल रझाक मेमन याला फाशी देण्याबाबतचा ‘डेथ वॉरंट’ मुंबईच्या टाडा न्यायालयाने जारी केला असून...

Yakub's death warrant reached Nagpur | याकूबचा ‘डेथ वॉरंट’ नागपुरात पोहचला

याकूबचा ‘डेथ वॉरंट’ नागपुरात पोहचला

जन्मदिन मृत्युदिन ठरणार
फाशीवर देशाची नजर
कडेकोट बंदोबस्ताची आखणी

नागपूर : मुंबई येथे १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्ब स्फोट मालिकेतील मुख्य आरोपी याकूब अब्दुल रझाक मेमन याला फाशी देण्याबाबतचा ‘डेथ वॉरंट’ मुंबईच्या टाडा न्यायालयाने जारी केला असून तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात धडकला आहे. मेमनला त्याच्या जन्मदिवशी ३० जुलै रोजी सकाळी ७ वाजता फासावर लटकावले जाणार असल्याने जन्मदिन मृत्युदिन ठरणार आहे. याकुबला फाशी टाळण्यासाठी आणखी एक अखेरची संधी आहे. २१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात त्याच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी होणार आहे.
५३ वर्षीय याकुब मेमन हा चार्टर्ड अकाऊंटन्ट आहे. प्रत्यक्ष फाशी देण्याच्या पंधरा दिवसांपूर्वीच याकूबच्या घरच्यांना नियमाप्रमाणे फाशीची माहिती देणे बंधनकारक असल्याने ही माहिती त्याच्या घरच्यांना देण्यात आलेली आहे. कारागृहातील अंडा बराकीत त्याला ठेवण्यात आलेले असून त्याच्या शेजारच्या बराकीतील कैद्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. वेळोवेळी त्याची आरोग्य तपासणी केली जात असून त्याच्यावर मानसिक वा शारीरिक दबाव नाही, याबाबतची खात्री केली जात आहे. त्याने आपल्या वकिलांना भेटण्यासही नकार दिला आहे.(प्रतिनिधी)
याकूबचा डेथ वॉरंट जारी होताच नागपूर पोलीस प्रशासनाला अतिशय सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कारागृह सभोवताल आणखी वाढीव सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
फाशीच्या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता व्यक्त केली जात असून शहरात पोलिसांकडून जागोजागी नाकेबंदी केली जात आहे. विमानतळ, रेल्वेस्थानक आणि शहर बस अड्ड्यांवर विशेष देखरेख ठेवली जात आहे. हॉटेल्स, धाबे, बडे हॉटेल्स यांना आकस्मिक भेटी देऊन झडत्या घेतल्या जात आहे.
शहर प्रवेश नाक्यांवर वाहनांची झडती घेऊन त्यांना शहरात प्रवेश दिला जात आहे. संशयित वाटणाऱ्या व्यक्तींच्या झडत्या घेतल्या जात आहे. बेवारशांविरुद्धही कारवाई केली जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तसेच लष्करी गुप्तचरांकडून याकुबच्या फाशीपूर्वी आणि नंतर काय होऊ शकते याचा अंदाज घेतला जात आहे.

Web Title: Yakub's death warrant reached Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.