सर्वांगावर जखमा झालेल्या शुभमच्या डोळ्यात पोलीस होण्याचे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:31 AM2019-08-08T00:31:24+5:302019-08-08T00:33:12+5:30

शेजारच्या घरी वरच्या मजल्यावर कपाट चढविताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला; एवढा की सर्वांग पोळून निघाले! तरीही त्याच्या डोळ्यात स्वप्न आहे दुरूस्त होऊन पोलिसात भरती होण्याचे. यासाठी हवा आहे त्याला मदतीचा हात!

Wounds on all body Shubham's dream of becoming a policeman in the eyes | सर्वांगावर जखमा झालेल्या शुभमच्या डोळ्यात पोलीस होण्याचे स्वप्न

सर्वांगावर जखमा झालेल्या शुभमच्या डोळ्यात पोलीस होण्याचे स्वप्न

Next
ठळक मुद्दे१९ दिवसांपासून रुग्णालयात : गरीब कुटुंब झाले परिस्थितीपुढे हतबल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वसामान्य तरुणांसारखेही ‘त्याच्या’ही डोळ्यात स्वप्न आहे, पोलीस होण्याचे! त्यासाठी त्याने भरपूर सराव केला. कुणाच्या मदतीला धावून जाणे हा त्याचा स्वभाव. मात्र नियतीने डाव साधला. शेजारच्या घरी वरच्या मजल्यावर कपाट चढविताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला; एवढा की सर्वांग पोळून निघाले! सध्या तो नागपुरातील एका रुग्णालयात उपचार घेतोय. वडिलांजवळचे सर्व पैसे संपले. महागड्या उपचाराच्या वाटाही आखूडल्या. तरीही त्याच्या डोळ्यात स्वप्न आहे दुरूस्त होऊन पोलिसात भरती होण्याचे. यासाठी हवा आहे त्याला मदतीचा हात!
शुभम राजेंद्र वानखेडे असे या २४ वर्षीय युवकाचे नाव. कब्रस्तान रोडवरील भानखेडा येथे सिद्धार्थ वाचनालयाजवळ तो राहतो. हिस्लॉप कॉलेजमध्ये बी.ए.च्या पहिल्या वर्षाला तो शिकतो. एक बहीण, आई-वडील, आजीसह हे कुटुंब सर्वसाधारण स्थितीत जगत असताना १९ जुलैला आघात झाला. शेजारच्या मो. हुसेन यांनी घरी नवीन कपाट आणल्याने ते वरच्या मजल्यावर चढवायचे होते. यासाठी त्यांनी शुभमला आवाज दिला. नेहमीच्या सवयीप्रमाणे तो तातडीने मदतीला गेला. वरच्या मजल्यावर सर्वजण मिळून कपाट नेत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. शुभमसह पाचही जण भाजून निघाले. शुभमला मात्र भरपूर इजा झाली. त्याचे सर्वांग भाजून निघाले. धक्का एवढा जबरदस्त होता की पाठीमध्ये स्फोट होऊन मोठे छिद्र पडले. हातापायाची बोटे जळाली. शरीर भााजून निघाले.
त्याला तातडीने येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाजूक अवस्था असल्याने तातडीने उपचारही सुरू झाले. मात्र खर्च बराच आला. ज्या घरी अपघात घडला त्यांनी मदत म्हणून ७० हजार रुपये दिले. मात्र लाखाच्या घरात असलेला खर्च पेलण्याची ताकद शुभमच्या वडिलांकडे नाही. ते नागपुरातील एका खासगी कंपनीमध्ये तुटपुंज्या पगारावर सुरक्षा रक्षकाची नोकरी करतात. या पगारावर घराचा गाडा चालवितात. जवळचा होता तो सर्व पैसा संपला. आता उपचारासाठी छदामही नाही, अशी अवस्था या कुटुंबाची झाली आहे.
आपल्या तरण्याबांड नातवाची ही अवस्था पाहून वृद्ध आजीच्या डोळ्यात सतत आसवांचा पूर असतो. आपल्या नातवाला मदत मागण्यासाठी ही आजी बुधवारी सायंकाळी ‘लोकमत’च्या कार्यालयात आली, तेव्हाही तिच्या डोळ्यात आसवांच्या धारा आणि हुंदकेच होते. शुभम सर्वांगावर जखमा घेऊन रुग्णालयात उपचार घेत आहे.
त्याच्या उपचारासाठी पैसा जुळविताना या कुटुंबाची फरफट होत आहे. आयुष्याशी त्याचा सुरू असलेला संघर्ष पाहावताही येऊ नये असा आहे. त्याला वैद्यकीय उपचाराची आणि त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. समाजातील सहृदयतांकडून या कुटुंबाला आशा आहेत. ९५११८३४७८० या भ्रमणध्वनी क्रमांकावर कुटुंबीयांशी संपर्क साधून त्याला मदत करावी, अशी त्याच्या वडिलांची आर्त विनवणी आहे. हे सहृदयतांचे दानच शुभमच्या आयुष्याला पुन्हा बळ देऊ शकणार आहे.

Web Title: Wounds on all body Shubham's dream of becoming a policeman in the eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.